आशियाई कांस्यपदक विजेती महिला बॉक्सर एल. सरितादेवी हिच्यावरील बंदीची कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवल यांनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाला केली आहे. त्यांनी महासंघाचे अध्यक्ष डॉ. चिंग कुओ वुओ यांना या आशयाचे पत्रही पाठविले आहे.
दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पंचांच्या पक्षपाती निर्णयाचा निषेध करताना सरितादेवी हिने सुरुवातीला कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर झालेल्या वादंगानंतर तिने हे पदक स्वीकारले व पुन्हा ते व्यासपीठावर ठेवले. तिच्या या वर्तनाबद्दल महासंघाने तिच्यावर तात्पुरती बंदी घातली असून तिला नोटीस पाठविली आहे. सरितादेवीने त्यानंतर जाहीर माफीही मागितली होती. पण त्या वेळी डॉ. वुओ यांनी सरितादेवीची कारकीर्द संपली असल्याचे जाहीर केले होते.
सोनोवल यांनी डॉ. वुओ यांना लिहिलेल्या पत्रात सरितादेवीकडे सहानुभूतीपूर्वक पाहावे व बंदीचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली आहे. तिच्यावरील बंदीमुळे देशातील अन्य युवा खेळाडूंमध्ये निराशा निर्माण होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तिला झालेली शिक्षा पुरेशी आहे. देशातील बॉक्सिंगच्या हितासाठी महासंघाने आमच्या विनंतीला प्राधान्य द्यावे.
सरितादेवी हिच्याबरोबरच राष्ट्रीय पुरुष संघाचे प्रशिक्षक गुरबक्षसिंग यांच्यासह तीन भारतीय प्रशिक्षकांवरही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2014 रोजी प्रकाशित
सरितादेवीवरील बंदी स्थगित करावी -सोनोवल
आशियाई कांस्यपदक विजेती महिला बॉक्सर एल. सरितादेवी हिच्यावरील बंदीची कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवल यांनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाला केली आहे.

First published on: 04-12-2014 at 04:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarita devi ban sarbananda sonowal requests aiba to be lenient