सौरभ वर्माला विजेतेपद

संघर्षपूर्ण लढतीत चीनच्या सन झियांगवर तीन गेममध्ये मात

(संग्रहित छायाचित्र)

व्हिएतनाम खुली बॅडमिंटन स्पर्धा

भारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने रविवारी व्हिएतनाम खुल्या ‘बीडब्लूएफ टूर सुपर १००’ बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. सौरभने चीनच्या सन फेई झियांगवर संघर्षपूर्ण विजय मिळवला.

१ तास आणि १२ मिनिटे रंगलेल्या अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित सौरभने झियांगला २१-१२, १७-२१, २१-१४ असे तीन गेममध्ये पराभूत केले. सौरभचे हे या वर्षांतील तिसरे विजेतेपद ठरले. त्याने या वर्षी हैदराबाद आणि स्लोव्हेनिअन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.

जागतिक क्रमवारीत ४४व्या स्थानी असलेल्या सौरभने अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. पहिल्या गेममध्ये त्याने ११-४ अशी आघाडी घेतली. त्याने झियांगला फारशी संधी न देता पहिला गेम

२१-१२ असा सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र झियांगने जोरदार पुनरागमन केले. ८-० अशी आघाडी घेऊन त्याने सौरभवर दडपण आणले. सौरभने ११-१४ अशी पिछाडी कमी केल्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली; परंतु झियांगने संधी न गमावता सौरभला दुसऱ्या गेममध्ये २१-१७ असे नमवून १-१ अशी बरोबरी साधली.

निर्णायक तिसऱ्या गेममध्ये पुन्हा एकदा दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. मध्यंतराला सौरभने ११-७ अशी आघाडी मिळवण्यात यश मिळवले. मात्र त्यानंतर झियांगने सर्वस्व पणाला लावून गुणांचे अंतर १४-१७ असे कमी केले; परंतु २६ वर्षीय सौरभने सलग चार गुण मिळवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

म्यानमार स्पर्धेत मुंबईकर कौशलची बाजी

यांगोन : मुंबईच्या २३ वर्षीय कौशल धर्मामेरने म्यानमार आंतरराष्ट्रीय सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद मिळवले. कौशलने इंडोनेशियाच्या कारोनोला अंतिम सामन्यात १८-२१, २१-१४, २१-११ असे पिछाडीवरून सरशी साधून नमवले. मुंबईतील उदय पवार बॅडमिंटन अकादमी येथे प्रशिक्षण घेणाऱ्या कौशलने गतवर्षी ऑक्टोबरमध्ये हॅट्झर स्पर्धेचेही विजेतेपद मिळवले होते.

संपूर्ण आठवडाभरात मी ज्या प्रकारे खेळ केला, त्यासाठी फार आनंदी आहे. जपानच्या तीन खेळाडूंना पराभूत करून मी अंतिम फेरी गाठली. त्याशिवाय झियांगनेही मला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. त्यामुळे हे विजेतेपद माझा आत्मविश्वास उंचावणारे आहे.

– सौरभ वर्मा, विजेता

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Saurabh varma is the winner ietnam open badminton tournament abn