रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेलने फॉर्म्युला-वन शर्यतीत आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करत कोरियन ग्रां.प्रि.चे जेतेपद पटकावले. या शानदार विजयासह वेटेलने स्पर्धकांच्या गुणतक्त्यामध्ये (ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप) कट्टर प्रतिस्पर्धी फर्नाडो अलोन्सोला सहा गुणांनी मागे टाकत दमदार आघाडी घेतली आहे.
वेटेलने दुसऱ्या स्थानापासून शर्यतीला सुरुवात केली. मात्र पहिल्याच टप्प्यात त्याने सहकारी मार्क वेबरला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले. यानंतर संपूर्ण शर्यतीत आघाडी न गमावता वेटेलने १ तास, ३६ मिनिटे आणि २८ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. रेड बुलच्याच वेबरने दुसरे तर फेरारीच्या अलोन्सोने तिसरे स्थान पटकावले. फोर्स इंडियाच्या निको हल्केनबर्गला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मॅकलारेनचा लुइस हॅमिल्टन दहाव्या स्थानी स्थिरावला.
‘‘माझी सुरुवात चांगली झाली आणि हाच विजयातील महत्त्वाचा मुद्दा आहे. रस्त्याच्या खराब भागातून मी शर्यतीला सुरुवात केली. त्यामुळे अव्वल स्थानाबाबत मला विश्वास वाटत नव्हता. पण शर्यत सुरू झाल्यानंतर मी झटपट परिस्थितीशी जुळवून घेतले आणि अव्वल स्थान पटकावले,’’ असे वेटेलने सांगितले. यंदाच्या हंगामातील वेटेलचे हे चौथे जेतेपद आहे.