पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं धुंवाधार फलंदाजी करत क्रिकेटमध्ये Age just a number असल्याचं दाखवून दिलं आहे. श्रीलंका येथे सुरु असलेल्या लंका प्रिमिअम लीगमध्ये आफ्रिदीनं झंझावाती फलंदाजी करत अवघ्या २० चेंडूत अर्धशतकी खेळी केली आहे. पण आफ्रिदीची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

लंका प्रिमिअम लीगमध्ये झालेल्या गॉल ग्लेडीएटर्स आणि जाफना स्टॅलियन्स यांच्यामध्ये शुक्रवारी दुसरा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानच्या आफ्रिदीनं तुफानी फलंदाजीचं प्रदर्शन करत सर्वांनाच प्रभावित केले. आफ्रिदीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, फक्त ९३ धावांत ग्लेडीएटर्स संघाचे अर्धे फलंदाज माघारी परतले होते.

संघ आडचणीत असताना ग्लेडीएटर्सचा कर्णधार आफ्रिदी मैदानात उतरला आणि चौफेर फटकेबाजी केली. आफ्रिदी मैदानात उतरला तेव्हा ग्लेडीएटर्सच्या १३. ३ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात ९३ धावा होत्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार शाहिद आफ्रिदीनं अवघ्या २० चेंडूत अर्धशतकी खेळी केली. १८ व्या षटकांत आफ्रिदीनं चार उतुंग षटकार लगावले. आफ्रिदीनं या सामन्यात २३ चेंडूत ५८ धावांची तुफानी खेळी केली. आफ्रिदीच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर ग्लेडीएटर्स संघानं २० षटकांत १७५ धावांपर्यंत मजल मारली.

ग्लेडीएटर्सने दिलेले १७६ धावांचे लक्ष्य स्टॅलियन्सने ८ गडी राखून पार केलं. अविष्काच्या विस्फोटक ९२ धावांच्या बळावर स्टॅलियन्सने १७६ धावांचं लक्ष १९.३ षटकांत पार केलं.