अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजीचं मोठं आव्हान परतवून लावण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. तिसऱ्या टी-२० सामन्यात १२ धावांनी बाजी मारत कांगारुंनी टी-२० मालिकेचा शेवट गोड केला. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची आक्रमक खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरचा सामना भारताने गमावला असला तरीही टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारण्यात भारत यशस्वी ठरलाय.

अखेरच्या सामन्यात मॅथ्यू वेड फलंदाजी करत असताना DRS चा निर्णय घेण्यावरुन विराट आणि पंचांमध्ये मैदानावर वाद रंगला. नटराजनच्या गोलंदाजीवर मॅथ्यू वेड पायची असल्याचं अपील भारताने केलं, पंचांनी अपील नाकारल्यानंतर भारताने DRS चा निर्णय घ्यायच्या आधीच मैदानावरील टिव्ही स्क्रिनवर त्या बॉलचा रिप्ले दाखवण्यात आला….ज्यानंतर भारताला DRS ची संधी नाकारण्यात आली. विराट कोहलीने यावर नाराजी व्यक्त केली.

“तो निर्णय खरंच आश्चर्यकारक होता. आम्ही DRS घ्यायचा की नाही याबद्दल चर्चा करत होतो, १५ सेकंदांचा वेळ होता आणि तितक्यात स्क्रिनवर रिप्ले दाखवण्यात आला. पण ज्यावेळी आम्ही DRS ची मागणी केली त्यावेळी पंचांनी ती नाकारली. मी चर्चा केली त्यावेळी पंचांनी अशा परिस्थितीत आपल्याला काही करता येणार नाही असं सांगितलं. ती १५ सेकंद आम्हाला पुढे चांगलीच महागात पडली.” विराटने सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आपलं मत मांडलं.