Questioning the role of NCA about Shreyas Iyer : भारतीय क्रिकेट संघाला आशिया चषक २०२३ च्या सुपर फोर सामन्यापूर्वी १० सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध मोठा धक्का बसला आहे. खरं तर, दुखापतीनंतर पुनरागमन करणारा श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया चषक २०२३ सुपर फोर सामन्यातून बाहेर पडला आहे, ज्यामुळे हरभजन सिंग आणि सुनील गावस्कर सारख्या माजी क्रिकेटपटू चिंतेत आहेत.
श्रेयस अय्यर सध्या सुरू असलेल्या आशिया कप २०२३ मध्ये फक्त एकाच डावात खेळू शकला आहे, तर त्याला दुसऱ्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि आता तिसऱ्या सामन्यापूर्वी त्याला पुन्हा दुखापत झाली. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाला आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ लक्षात घेऊन संघात बदल करण्याचा विचार करावा लागू शकतो.
हे श्रेयस अय्यरसाठी दुर्दैवी आहे –
सुनील गावस्कर यांनी इंडिया टुडेच्या हवाल्याने म्हटले आहे की, “श्रेयस अय्यरला पुन्हा दुखापत होणे, ही भारतासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. दुखापतीमुळे तो आधीच ५-६ महिने बाहेर होता. आता आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या एक महिना आधी त्याला पुन्हा दुखापत झाली आहे, त्यामुळे ही चिंतेची बाब आहे.”
हेही वाचा – IND vs PAK: “माझे फक्त एकच ध्येय आहे की भारताला…”; पाकिस्तानविरुद्धच्या अर्धशतकानंतर शुबमन गिलने केला खुलासा
सुनील गावस्कर पुढे म्हणाल, “सर्वात मोठी दिलासादायक गोष्ट म्हणजे आपण अजूनही आपल्या २०२३ विश्वचषक संघात बदल करू शकतो. त्यामुळे अय्यर तंदुरुस्त नसल्यास, कोणीतरी त्याची जागा घेईल. मात्र, अय्यरसाठी हे दुर्दैवी आहे, कारण पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने शानदार कव्हर ड्राइव्ह खेळले होते.”
हेही वाचा – Asia Cup: कोलंबो येथील भारत-पाक सामन्यातील पावसाने करून दिली २००२ ची आठवण, जाणून घ्या काय झाले होते?
त्याचवेळी हरभजन सिंग म्हणाला की, “दुखापती हा खेळाचा एक भाग असतो. पण पुन्हा पुन्हा दुखापत होणे, हे एकतर दुर्दैव आहे किंवा तुम्ही केएल राहुलसाठी जागा बनवत आहात. यावेळी श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे त्याचे संघातील स्थान जाईल आणि केएल राहुलसाठी हे फायदेशीर ठरेल. खेळाडूंना वारंवार दुखापत होत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे प्रशिक्षण. याचे उत्तर एनसीएला द्यावे लागेल. कारण सर्व खेळाडू सारखेच रिहॅब करतात आणि स्वत:ला प्रशिक्षित करतात.”