शुभम गिल, पृथ्वी शॉ यांची शतके

पृथ्वी शॉ आणि शुभम गिल यांच्या दिमाखदार शतकांच्या बळावर भारताच्या युवा (१९ वर्षांखालील) संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर २३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ३-१ अशी जिंकली आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३८२ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर वेगवान गोलंदाज कमलेश नगरकोटी (४/३१), विवेकानंद तिवारी (३/२०) आणि शिवम मावी (२/१८) यांनी इंग्लंडचा डाव ३७.४ षटकांत १५२ धावांत गुंडाळला.

भारताच्या गिलने कर्णधार हिमांशू राणा (३३) सोबत ८३ धावांची सलामी दिली. मग गिल आणि शॉ यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६४ चेंडूंत २३१ धावांची भागीदारी रचली. मागील सामन्यात नाबाद १३८ धावा करणाऱ्या गिलने स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह, स्वीप, पॅडल स्वीप व पूलच्या फटक्यांनी नजाकत पेश केली. त्याने १२० चेंडूंत २३ चौकार आणि एका षटकारासह १६० धावा केल्या, तर शॉने १२ चौकार व दोन उत्तुंग षटकारांसह ८९ चेंडूंत १०५ धावा केल्या.