IND vs SA Test Series: भारतीय संघाला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यात ३० धावांनी पराभव पत्करावा लागला. कोलकातामधील ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय सघ १२४ धावांचे आव्हान गाठू शकला नाही. धक्कादायक पराभव झाल्याने कर्णधार शुबमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात घरच्या मैदानावर आदर्श खेळपट्ट्या कशा असाव्यात यावर मोठा वाद निर्माण झाला आहे का? अशी चर्चा सुरू आहे.
भारताच्या या अपयशामागे ईडन गार्डन्सची खेळपट्टीदेखील कारणीभूत आहे. भारताचे कोच गौतम गंभीर यांनी ही रँक टर्नर खेळपट्टी तयार करून घेतली होती. गंभीर यांनी स्वत: पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली होती. तर सौरव गांगुली यांनी देखील हेच सांगितलं होतं की भारतीय संघाला अशी कोरडी खेळपट्टी होती. पण यावरून आता शुबमन गिल आणि कोच गंभीर यांच्यात मतभेद आहेत का यावर देखील चर्चा सुरू आहे.
गेल्या महिन्यातच, अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिज कसोटी मालिकेपूर्वी, गिलने ठामपणे सांगितलं होतं की संघ “रँक टर्नर्स” खेळपट्टी तयार करण्यापासून दूर गेला आहे. “आम्ही अशा खेळपट्टीवर खेळण्याचा प्रयत्न करू जिथे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही फायदा होईल,” असं गिल म्हणाला होता, त्याने घरच्या मैदानावरील परिस्थितीत संतुलन राखण्याच्या नवीन दृष्टिकोनावर भर दिला होता.
पण, भारताने त्यांच्या कर्णधाराच्या वक्तव्याच्या अगदी विरूद्ध असलेल्या खेळपट्टीवर वर्ल्ड चॅम्पियन संघाविरुद्ध मालिका खेळण्याचा निर्णय घेतला. ईडन गार्डन्सची खेळपट्टी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी न देता ठेवली गेली आणि दररोज संध्याकाळी खेळपट्टी कव्हरखाली असे. परिणामी खेळपट्टी कोरडी आणि भेगा पडलेली तयार झाली आणि पहिल्या सत्रापासूनच त्याचा परिणाम दिसून आला.
परिणामी पहिला कसोटी सामना आठ सत्रात संपला, ज्यामध्ये ३८ विकेट्स पडल्या, त्यापैकी २२ विकेट्स फिरकी गोलंदाजांनी आणि १६ विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. गिलच्या मते संघ रँक टर्नर्स खेळपट्ट्या बनण्याच्या विचारात नाही, परंतु कोलकाता खेळपट्टी वेगळीच सांगून गेली. तर, गंभीर ठामपणे म्हणाला की, ही खेळपट्टी आमच्या सांगण्यावरूनच तयार केली होती.
भारताच्या पराभवानंतर कोच गंभीर म्हणाला, जर तुम्ही चांगले खेळला नाही तर असंच घडतं. हा कसोटी सामना संघाने जिंकला असता तर तुम्ही या खेळपट्टीबद्दल चर्चाही केली नसती.” कर्णधार गिल व कोच गंभीरच्या संभाषणातील दरी इथे स्पष्ट दिसून येते. गिलने गोलंदाज व फलंदाजांसाठी संतुलन असलेल्या खेळपट्टीची मागणी केली होती, तर कोचला नेमकं जे घडले तेच अपेक्षित होतं.
दरम्यान, मानदुखीमुळे कर्णधार गिल खेळायलाही उतरू शकला नाही आणि त्याली रुग्णालयात दाखल करावं लागलं. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिल खेळण्याबाबत शंका आहे.
