राष्ट्रीय कुमार मानांकन टेनिस स्पर्धा
सिद्धार्थ साबळे व ज्ञानदा पाटील यांनी अनपेक्षित विजय मिळवत प्रवीण करंडक २६ व्या राष्ट्रीय कुमार मानांकन टेनिस स्पर्धेत अपराजित्व राखले. १२ वर्षांखालील मुलांच्या गटात सिद्धार्थ साबळे याने सातवा मानांकित खेळाडू क्रिश पटेल याच्यावर मात केली. त्याने हा सामना ४-५, ४-१, ७-२ असा जिंकला. वामसी कृष्णादेवसानी यानेही आश्चर्यजनक विजय नोंदवताना चौथ्या मानांकित सुंदर अरविंद याला २-४, ४-२, ७-३ असे पराभूत केले. आठवा मानांकित अथर्व शर्मा यालाही पराभवाचा धक्का बसला. टेरेन्स दास याने त्याच्यावर ४-१, ४-२ अशी मात केली. मुलींच्या १२ वर्षांखालील गटात ज्ञानदा पाटील या बिगरमानांकित खेळाडूने द्वितीय मानांकित रचना रेड्डी हिच्यावर ५-३, ४-२ असा सनसनाटी विजय मिळविला. तेजस्वी काटे हिने आव्हान राखताना सालसा आहेर हिला २-४, ५-४, ७-३ असे पराभूत केले. नेहा घारे हिने ध्रुवा देव हिचे आव्हान ०-४, ४-२, ७-५ असे संपुष्टात आणले. तिसऱ्या मानांकित कृत्तिका छाब्रा हिने शरण्या गवारे हिला २-४, ४-०, ७-१ असे हरविले.