सिंगापूर : दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूने शुक्रवारी रोमहर्षक विजयासह सिंगापूर खुल्या बॅडिमटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित सिंधूने चीनच्या हॅन युईचे कडवे आव्हान एक तासांहून अधिक काळाच्या झुंजीनंतर १७-२१, २१-११, २१-१९ असे मोडीत काढले. मे महिन्यात झालेल्या थायलंड खुल्या स्पर्धेनंतर प्रथमच सिंधूने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. सिंधूचा पुढील फेरीत जागतिक क्रमवारीत ३८व्या क्रमांकावरील जपानच्या सेईना कावाकामीशी सामना होणार आहे. तिने थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचूवांगला २१-१७, २१-१९ असे नामोहरम करून खळबळ माजवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता भारताच्या आव्हानाची भिस्त एकमेव सिंधूवर अवलंबून आहे. बर्मिगहॅमला होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेआधी ही अखेरची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. सिंधूने सेईनाविरुद्ध आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत.

जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूला पहिल्या गेममध्ये क्रमवारीत १९व्या क्रमांकावरील हॅनने झगडायला लावले. विश्रांतीला ११-९ अशी हॅनकडे आघाडी होती. त्यानंतर सिंधूच्या बचावातील उणिवांमुळे हॅनने पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममधील विश्रांतीला सिंधूकडे तीन गुणांची आघाडी होती. त्यानंतर सिंधूने वर्चस्वपूर्ण खेळासह सात गुणांची आघाडी मिळवली आणि नंतर गेमसुद्धा आरामात जिंकला.

तिसऱ्या गेममध्ये सिंधू सुरुवातीला ८-११ आणि नंतर ९-१४ अशी पिछाडीवर होती. मग काही लक्षवेधी रॅलिजमुळे सलग पाच गुणांच्या कमाईसह १४-१४ अशी बरोबरी साधली. मग ही चुरस १९-१९ अशी टिकून होती. परंतु अखेरीस सिंधूने खेळ उंचावत निर्णायक गेमसह सामना जिंकला.

सायना, प्रणॉय पराभूत

सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय यांचे आव्हान संपुष्टात आले. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने चीनच्या जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावरील बिंग जियाओला हरवून सूर गवसल्याची ग्वाही दिली होती. परंतु उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या डावखुऱ्या अया आहोरीविरुद्ध तिने १३-२१, २१-१५, २०-२२ अशी हार पत्करली. भारताची ३२ वर्षीय अनुभवी बॅडिमटनपटू सायनाला दोनदा सामना जिंकण्याचा गुण मिळवण्यात अपयश आले. त्यामुळे आहोरीने बाजी मारली. प्रणॉयने पहिला गेम जिंकून आशा निर्माण केली. परंतु जपानच्या कोडाय नाराओकाविरुद्ध त्याचा निभाव लागला नाही. नाराओकाने १२-२१, २१-१४, २१-१८ अशा फरकाने हा सामना जिंकला. पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन आणि ध्रव कपिला जोडीने इंडोनेशियाच्या मोहम्मद एहसान आणि हेंड्रा सेटियावान जोडीकडून १०-२१, २१-१८, २१-१७ असा पराभव पत्करला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singapore open 2022 pv sindhu beats han yue to enter semifinals zws
First published on: 16-07-2022 at 01:36 IST