SL vs BAN, Asia Cup Highlights: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील ५ वा सामना बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशला २० षटकांअखेर ५ गडी बाद १३९ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने ६ गडी राखून विजयाची नोंद केली आहे.

आशिया चषकातील सुरुवातीच्या ४ सामन्यांमध्ये एकतर्फी लढत पाहायला मिळाली आहे. या सामन्यातही असच काहीसं चित्र पाहायला मिळालं. श्रीलंकेने या सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद केली. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १४० धावा करायच्या होत्या. श्रीलंकेचा फलंदाजीक्रम पाहता हे आव्हान फार मोठं नव्हतं.

या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून सलामीला आलेल्या पथुम निसंकाने ३४ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराचा साहाय्याने ५० धावांची खेळी केली. पण कुसल मेंडीसला हवी तशी सुरुवात करून देता आली नाही. तो अवघ्या ३ धावांवर माघारी परतला. तर कुसल परेराने ९ धावांची खेळी केली. दासून शनाका १ धाव करून माघारी परतला. पण कामिल मिशारा शेवटपर्यंत टिकून राहिला. त्याने नाबाद ४६ धावांची खेळी करून श्रीलंकेच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या विजयासह श्रीलंकेने २ गुणांची कमाई केली आहे. बांगलादेशचा हा २ सामन्यातील पहिला पराभव आहे. जर बांगलादेशने आणखी १ सामना गमावला तर, त्यांच्या सुपर ४ मध्ये प्रवेश करण्याच्या अडचणी वाढू शकतात.

बांगलादेशने दिलं १४० धावांचं आव्हान

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला हवी तशी सुरुवात करता आली नाही. सलामीला आलेले तांझिद हसन आणि परवेज हुसेन शून्यावर माघारी परतले. गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर कर्णधार लिटन दासने या डावातही हातभार लावत २८ धावांची खेळी केली. शेवटी जाकेर अलीने नाबाद ४१ आणि शमीम हुसेनने नाबाद ४२ धावा करत संघाची धावसंख्या ५ गडी बाद १३९ धावांवर पोहोचवली.