IND vs SA Eden Gardens Pitch Controversy: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या कसोटीत दोन्ही संघांना २०० धावांचा आकडाही गाठता आला नाही. तर दोन दिवसांत २७ विकेट्स पडल्या आहेत. यासह आता ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवरून वाद वाढत चालला आहे. यादरम्यान क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मात्र पिच क्युरेटरचा बचाव केला आहे आणि गंभीरवर याचं खापर फोडलं आहे.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात १५९ धावा केल्या. त्यानंतर भारताचा डाव १८९ धावांवर संपला. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेने सात विकेट गमावल्या होत्या. तर तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात आफ्रिकेचा संघ १५३ धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान खेळपट्टीवरून गदारोळ सुरू असताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया.
सौरव गांगुलीने न्यूज १८ बांग्लाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, “भारतीय संघालाच अशी खेळपट्टी हवी होती. जर तुम्ही चार दिवस खेळपट्टीला पाणी घातलं नाही तर असंच घडतं. क्युरेटर सुजन मुखर्जी यांना दोष देता येणार नाही.”
या आठवड्याच्या सुरुवातीला सौरव गांगुलीने स्वतः गौतम गंभीर आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने टर्निंग पिचची मागणी केलेली नसल्याचे म्हटल्यानंतर त्यांनी आता हे विधान केलं आहे. सोमवारी सकाळी भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांच्यासह ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीची पाहणी केली. गांगुलीने संध्याकाळी खेळपट्टीची पाहणीही केली, त्यानंतर दव किंवा संभाव्य पावसापासून संरक्षण करण्यासाठी संपूर्ण खेळपट्टी झाकण्यात आली.
“त्यांनी अजून टर्निंग पिच असलेली खेळपट्टी तयार करण्याती मागणी केलेली नाही, त्यामुळे मी त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. ही खूप चांगली खेळपट्टी दिसतेय,” गांगुलीने असं सोमवारी पीटीआयला सांगितलं होतं.
शनिवारी, भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केलने सांगितलं की ईडन गार्डन्सची खेळपट्टी इतक्या लवकर खराब झाल्याने तो देखील आश्चर्यचकित झाला. मॉर्केल म्हणाला की, खेळपट्टी इतक्या लवकर खराब होईल अशी संघाला अपेक्षा नव्हती.
दरम्यान हरभजन सिंगनेही ट्विट करत ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात हरभजनने लिहिलं, भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामना दुसऱ्याच दिवशी खरंतर संपला आहे. पण अजून निकाल कसा लागला नाही. कसोटी क्रिकेटची काय थट्टा सुरू आहे. #RIP टेस्ट क्रिकेट.
