South Africa Announces Squad for WTC Final: आयपीएल २०२५ चं नवीन वेळापत्रक आल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी दोन्ही संघांनी आपल्या स्क्वॉड जाहीर केल्या आहेत. ऑस्ट्रेलियापाठोपाठ आता दक्षिण आफ्रिकेनेही संघ जाहीर केला आहे. दरम्यान आयपीएल २०२५ च्या या बदलेल्या वेळापत्रकामुळे आणि WTC फायनलमध्ये संघांमध्ये बदल होताना दिसणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे आणि हा अंतिम सामना ११ जून ते १५ जून दरम्यान लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा एका व्हीडिओच्या माध्यामातून संघ जाहीर केला आहे.
आफ्रिकन संघाने स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला संघात समाविष्ट केले आहे. डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्यानंतर रबाडावर अलिकडेच एक महिन्याची बंदी घालण्यात आली होती. दरम्यान तो आयपीएल २०२५ मधूनही बाहेर पडला होता. रबाडाने स्वत: याबाबत माहिती दिली होती. पण आता एका महिन्याची बंदीनंतर तो राष्ट्रीय संघातून खेळताना दिसेल.
रबाडा व्यतिरिक्त दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या लुंगी एनगिडीलाही संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय, युवा वेगवान गोलंदाज क्वेना मफाका, मार्को यानसेन, कॉर्बिन बॉश आणि वियान मुल्डर यांचाही समावेश करण्यात आला आहे. मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड म्हणाले की त्यांच्या संघाने इंग्लंडमधील परिस्थितीनुसार योग्य खेळाडूंची निवड केली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन WTC चक्रांमध्ये प्रथमच WTC फायनल खेळत आहे. संघाची कमान टेम्बा बावुमा याच्याकडे आहे. २०२३-२५ या कालावधीत संघाने एकूण १२ कसोटी सामने खेळले. यामध्ये संघाने ८ सामने जिंकले आणि तीन पराभव पत्करले, तर एक सामना अनिर्णित राहिला. यासह संघाची गुणांची टक्केवारी ६९.४४ आहे. आफ्रिकन संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ ६७.५४ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
WTC फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मारक्रम, लुंगी एनगिडी, टोनी डी झोर्झी, डेव्हिड बेडिंगहॅम, केशव महाराज, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश, सेनुरान मुथुसामी, मार्को यान्सन, कागिसो रबाडा, काइल वेरेन, डॅन पीटरसन, वियान मुल्डर, रायन रिकल्टन