डीकॉकचा माफीनामा ; वर्णद्वेषविरोधी मोहिमेला पाठिंबा देण्यास तयार

डीकॉकने सर्वप्रथम ही कृती करण्यास मनाई करतानाच वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या लढतीतून माघार घेतली होती.

शारजा : दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फलंदाज क्विंटन डीकॉकने गुरुवारी आफ्रिका क्रिकेट मंडळासह चाहत्यांची माफी मागून ट्वेन्टी-२० विश्वचषकातील उर्वरित लढतींसाठी आपण उपलब्ध असल्याचे जाहीर केले. गुडघा टेकून जमिनीवर बसण्याची कृती करण्यासाठी आपण तयार असल्याचेही डीकॉकने सांगितले.

कृष्णवर्णीय नागरिकांची हत्या आणि अत्याचाराविरोधात सध्या जगभरात ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ ही वर्णद्वेषविरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. त्यालाच पाठिंबा देण्याच्या उद्देशाने आफ्रिका क्रिकेट मंडळानेसुद्धा संघातील प्रत्येक खेळाडूला गुडघा टेकण्याची कृती करण्यास सक्तीचे केले. डीकॉकने सर्वप्रथम ही कृती करण्यास मनाई करतानाच वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या लढतीतून माघार घेतली होती. परंतु त्याच्यावर वर्णद्वेषीचा ठपका लगावण्यासह चाहत्यांकडून टीका करण्यात आल्यावर डीकॉकने आपला निर्णय बदलला आहे.

‘‘माझ्या कृत्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्याने मी माफी मागतो. मी गुडघा टेकून खाली बसल्याने जगभरातील वर्णद्वेष थांबणार असेल अथवा यामुळे इतरांच्या जीवनात सुधारणा होणार असेल, तर नक्कीच मी ही कृती करण्यास तयार आहे,’’ असे डीकॉकने म्हटले.

‘‘गेल्या काही दिवसांत मला वर्णद्वेषी ठरवण्यात आले. मी स्वत: एका कृष्णवर्णीय कुटुंबातच वाढलो आहे. त्यामुळे माझ्यासाठीही कृष्णवर्णीय नागरिक तितकेच महत्त्वाचे आहेत. परंतु फक्त एखाद्या स्पर्धेसाठी खास मोहीम राबवण्याचा विचार मला पटत नव्हता. त्याशिवाय त्यांच्याविषयी असलेली आपुलकी व्यक्त करण्यासाठी एखादी कृती करण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही,’’ असेही डीकॉकने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: South african decock apologizes and will kneel in the future zws

ताज्या बातम्या