सध्या भारतीय क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या क्रमांकावरून बरीच चर्चा चालू आहे. तीन, चार, पाच हे ते विवादाचे क्रमांक आहेत. तीन नंबरला कोहली का रहाणे का पुजारा, चार नंबरला रोहित का कोहली, पाचला रहाणे का रोहित असे विषय चर्चेत आहेत. ही चर्चा रास्त आहे. कारण प्रत्येक फलंदाज मानसिकरित्या कोणत्यातरी क्रमांकावर कम्फर्टेबल असतो. वन डाऊन फलंदाजालादेखील अगदी पहिल्या षटकात खेळायला जाणे भाग पडत असले (उदा.द्रविड) तरी तो तीन नंबरलाच प्राधान्य देतो.
सध्याच्या रचनेत रहाणेचा क्रमांक कसोटी सामन्यात कुठला या विषयी अनेक मतं आहेत. आपण रहाणेचा खेळ नीट पाहिला, तर असे लक्षात येईल की त्याची मूलभूत मानसिकता आक्रमणाची आहे. त्याच्या भात्यात अनेक फटके असल्याने त्याचे हात शिवशिवत असतात. टी-२०चा निष्णात खेळाडू असल्याने डोक्यावरून फटके मारण्याची त्याच्यात सुरसुरी आहे. अनेक कसोटी सामन्यात त्याचा संयम टिकत नाही, हे दिसून आले आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर कमी संयम, सुरूवातीलाच अॅक्रॉस खेळण्याची घाई, क्षेत्ररक्षक ३० यार्डात उभे असताना डोक्यावरून मारून बरोबर सापळ्यात अडकण्याची सवय ही सगळी लक्षणं अपरिपक्वतेची आहेत. म्हणून आपण रहाणेची धावसंख्या पाहिली तर अनेक डावात त्याचे ५,१०,२० अशा कमी धावा दिसतात. त्याचे फटके नयनरम्य आहेत. इतका सडपातळ खेळाडू इतक्या ताकदीचे फटके मारतो तेव्हा आपण स्तिमित होतो. फटक्यांचा फॉलोथ्रू छान असल्याने बॅटिंग बघत राहावी, असे वाटते. पण सातत्य नसले तर दर्शन चांगले असले तरी फायदा नाही. रहाणेने न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया येथे धावा केल्या आहेत. पण एक शतक केल्यावर पुढच्या बऱ्याच डावात तो लवकर बाद होतो. आणि मुख्य म्हणजे बाद होण्याच्या त-हा त्याच्या संयम आणि तंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.
या उलट मला रोहित मुंबईचे कर्णधारपद मिळाल्यापासून बदलेला माणूस वाटतोय. त्याचा निग्रह सशक्त झाल्यासारखा वाटतोय. मोक्याच्या क्षणी टिकून राहाणे या सूत्रावर तो काम करतोय. अर्थात बीसीसीआयने त्याला भरभरून संधी दिल्या आहेत. (आयएएससाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी आम्हाला रोहित एव्हढ़या संधी मिळायला हव्यात, असे आंदोलन छेडून मोदींची डोकेदुखी वाढवू शकतात) असो.
मुद्दा असा की रहाणेला अजून बरीच सुधारणा करायची आहे. इतक्यात त्याला आपला तारणहार, सचिनचा वारसदार वगैरे म्हणून चूक करू नये. दिल्ली बहोत दूर है!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sports blog by ravi patki on indian cricketer ajinkya rahane
First published on: 16-09-2015 at 10:34 IST