Sports Ministry Statement on India vs Pakistan Asia Cup 2025 Match: आशिया चषक २०२५ येत्या ९ सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये १४ सप्टेंबरला सामना खेळवला जाणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. यादरम्यान भारताने पाकिस्तानविरूद्ध सामन्यावर बहिष्कार टाकावा, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान क्रीडा मंत्रालयाने याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

भारत आणि पाकिस्तानचे संघ द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही संघांमधील द्विपक्षीय मालिका खेळण्यावर भारताने बंदी घातली. फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषकामध्ये दोन्ही संघ आमनेसामने येतात. याबाबतही क्रीडा मंत्रायलयाने वक्तव्य केलं आहे.

आशिया चषक २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही?

मंत्रालयाने भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा सहभागासंबंधी नवी धोरणं जाहीर केली असून त्यात पाकिस्तानविरूद्ध सामन्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलं की हे धोरण तत्काळ लागू करण्यात आलं आहे.

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान क्रिकेट मालिका होणार नाही पण आयसीसीतर्फे आयोजित विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी तसंच आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित आशिया चषकसारख्या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होईल असं क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे.

“भारताचं पाकिस्तानप्रति धोरण हे दोन देशांदरम्यानच्या क्रीडा संबंधांमध्येही प्रतीत होतं,” असं क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे. धोरणामध्ये पुढे नमूद केलं आहे की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात जाऊन खेळण्याची परवानगी नसेल. तसंच पाकिस्तान संघालाही भारतात येऊन सामने खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही.” पण बहुपक्षीय स्पर्धांमधील सहभागांवर परिणाम होणार नाही.

क्रीडा मंत्रालयातील एका सूत्राने सांगितलं की, “आशिया कप ही बहुपक्षीय स्पर्धा असल्यामुळे आम्ही भारतीय क्रिकेट संघाला त्यामध्ये खेळण्यापासून रोखणार नाही. पण पाकिस्तानला द्विपक्षीय मालिकेसाठी भारतात खेळण्याची परवानगी नसेल. आम्ही ऑलिम्पिक चार्टरचे पालन करू.”

क्रीडा मंत्रालयाचे हे धोरण केवळ क्रिकेटसाठीच लागू होणार नाही, तर त्यात इतर खेळांचाही समावेश असेल. याचा अर्थ आता कोणताही पाकिस्तानी खेळाडू कोणत्याही स्पर्धेसाठी भारतात येऊ शकणार नाही आणि कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानमध्ये जाऊ शकणार नाही. पण आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन्ही संघ किंवा खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील.