ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

डॉ. नीता ताटके, क्रीडा मानसतज्ज्ञ

मुंबई : करोनामुळे संपूर्ण क्रीडाविश्व एक प्रकारे बंद पडले असले, तरी खेळाडूंनी डगमगून न जाता या परिस्थितीकडे आत्मपरीक्षण करण्याची संधी म्हणून पाहावे, असा सल्ला क्रीडा मानसतज्ज्ञ डॉ. नीता ताटके यांनी दिला आहे. त्याशिवाय टाळेबंदीच्या काळातही खेळाडूंना स्वत:ची मानसिक तसेच शारीरिक तंदुरुस्ती जपता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील दादर येथे श्री समर्थ व्यायाम मंदिरात मल्लखांबचे प्रशिक्षण देणाऱ्या नीता रुपारेल महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणूनही कार्यरत आहेत. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत स्वत:चे मानसिक तसेच शारीरिक संतुलन बिघडू न देता खेळाडूंनी कशा प्रकारे यावर मात करावी, याविषयी नीता यांच्याशी केलेली ही बातचीत –

’टाळेबंदीच्या काळात खेळाडूंनी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीकडे कसे लक्ष द्यावे?

क्रीडा मानसतज्ज्ञ म्हणून मला नेहमी वाटते की, कोणत्याही खेळाडूने त्याच्यावर ओढवलेल्या परिस्थितीकडे संधी म्हणून पाहावे. त्यामुळे सर्वप्रथम तुमचा मानसिक दृष्टिकोन सकारात्मक असणे गरजेचे आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळाडूंना घरच्या घरी करता येणारे अनेक व्यायाम आहेत. सूर्यनमस्कार, योगासने, उडय़ा मारणे यांसारख्या व्यायामासाठी प्रत्येकाच्या घरात पुरेशी जागा नक्कीच असते. काहींना व्यायाम करण्यासाठी मित्रमंडळीसोबत असावी लागते, तर काही जण प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि शांततेशिवाय व्यायाम करू शकत नाहीत. मात्र या काळात स्वत:ला नवी सवय लावून घेण्याची सर्व खेळाडूंना संधी आहे. त्याशिवाय प्रत्येक खेळाडूची आर्थिक परिस्थिती भिन्न असली तरी त्याच्याकडे स्मार्टफोन नक्कीच असतो. त्यामुळे समाजमाध्यमांवर अधिक वेळ दवडण्यापेक्षा घरात करता येणाऱ्या व्यायामांच्या चित्रफिती पाहूनही खेळाडू स्वत:चे शारीरिक संतुलन सांभाळू शकतो.

’मनाच्या एकाग्रतेसाठी ‘शॅडो प्रॅक्टिसिंग’ करणे खेळाडूंसाठी किती लाभदायक आहे?

मुळात ‘शॅडो प्रॅक्टिसिंग’विषयी खेळाडूंबरोबरच अनेक सामान्य नागरिकांच्या मनात गैरसमज आहे, असे मला वाटते. क्रीडा मानसतज्ज्ञ म्हणून मी शॅडो प्रॅक्टिसिंगऐवजी मानसिक सराव (मेंटल प्रॅक्टिसिंग) करण्याचे खेळाडूंना सुचवते. यामध्ये तुमच्या कल्पनेला अधिक वाव मिळतो. सध्याच्या काळात खेळाडूंना किमान घरच्या घरी व्यायाम करता येणे शक्य आहे. परंतु एखाद्या खेळाडूला दुखापत झाली असेल आणि त्याला तीन ते चार आठवडे विश्रांतीची आवश्यकता असल्यास तो शारीरिक तंदुरुस्ती राखू शकत नाही. अशा वेळी मानसिक सराव त्याला लाभदायक ठरतो. यामध्ये खेळाडू डोळे बंद करून स्वत:च्या श्वासावर लक्ष केंद्रित करू शकतो. त्याच वेळी तो स्वत:ला त्याच्या क्रीडाप्रकारात सर्वोच्च यश मिळवतानाचे चित्र डोळ्यांसमोर उभे करू शकतो. सर्व क्रीडापटूंसाठी हा सराव उपयुक्त असून एकदा या सरावाला सुरुवात केल्यास खेळाडूचे कधीच खच्चीकरण होणार नाही, याची मला खात्री आहे. त्याउलट ‘शॅडो प्रॅक्टिसिंग’मध्ये आपण समोरील व्यक्तीला पाहून एखादी कृती करतो. अपंग, मूकबधिर खेळाडू तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘शॅडो प्रॅक्टिसिंग’ प्रामुख्याने वापरली जाते.

’उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान अनेक मुले विविध क्रीडा शिबिरांत सहभागी होतात, परंतु सध्याच्या परिस्थितीत तुम्ही त्यांना कोणते मार्गदर्शन कराल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षी श्री समर्थ व्यायाम मंदिरातर्फे उन्हाळ्याच्या सुट्टीत आयोजित करण्यात येणारे क्रीडा शिबीर हे सर्व खेळांच्या भक्कम पायाभरणीसाठी उपयुक्त असते. परंतु यंदा ते शक्य नसल्याने पालकांनी मुलांच्या शारीरिक हालचालींकडे लक्ष केंद्रित करावे, अशी माझी अपेक्षा आहे. जे विद्यार्थी सोसायटीमध्ये राहतात त्यांना दिवसातून किमान एका तासासाठी सोसायटीच्याच प्रांगणात अथवा जवळच्या क्रीडांगणात व्यायाम करता येऊ शकतो. परंतु यादरम्यान सामाजिक अंतराचे भान बाळगणेही आवश्यक आहे. त्यामुळे दोन-तीन मुलांचा प्रत्येकी एक गट पाडून, असे उपक्रम पालकांच्या निदर्शनाखाली करता येऊ शकतात. चाळीत राहणाऱ्या मुलांसाठी सध्या हे काहीसे कठीण असले तरी घरच्या घरी पालक आपापल्या मुलांची शारीरिक जडणघडण नक्कीच करू शकतात.