वृत्तसंस्था, गॉल : दिनेश चंडिमलच्या (२३२ चेंडूंत नाबाद ११८ धावा) शतकाच्या बळावर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ४३१ धावांची मजल मारली. त्यामुळे पहिल्या डावात त्यांच्याकडे ६७ धावांची आघाडी होती.
श्रीलंकेने तिसऱ्या दिवशी २ बाद १८४ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. कुसाल मेंडिसला (१६१ चेंडूंत ८५) नेथन लायनने बाद केले. यानंतर अँजेलो मॅथ्यूज (११७ चेंडूंत ५२) आणि चंडिमलने चौथ्या गडय़ासाठी ८३ धावांची भागीदारी रचली. मॅथ्यूजला स्टार्कने माघारी पाठवल्यावर चंडिमलने पदार्पणवीर कामिंदू मेंडिसच्या (१३७ चेंडूंत ६१) साथीने पाचव्या गडय़ासाठी १३३ धावांची भागीदारी रचत श्रीलंकेला ४०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र, दिवसाच्या अखेरच्या काही षटकांत मेंडिस आणि निरोशन डिकवेला (५) बाद झाले. चंडिमल ११८ धावांवर, तर रमेश मेंडिस ७ धावांवर खेळत होता.
संक्षिप्त धावफलक
- ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३६४
- श्रीलंका (पहिला डाव) : १४९ षटकांत ६ बाद ४३१ (दिनेश चंडिमल खेळत आहे ११८, दिमुथ करुणारत्ने ८६, कुसाल मेंडिस ८५; मिचेल स्टार्क २/४७, मिचेल स्वेपसन २/९०)