तिरंगी मालिका
वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत भारताला सलग दुसऱया पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मंगळवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा तब्बल १६१ धावांनी पराभव झाला आहे.
दुखापतग्रस्त धोनीच्या गैरहजेरीत विराट कोहली भारतीय संघाचे प्रभारी कर्णधारपद सांभाळत आहे. कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. श्रीलंकेने दमदार फलंदाजी करत भारतासमोर ३४९ धावांचा डोंगर रचला. यात लंकेचा डावखूरा फलंदाज उपूल तरंगाने १५९ चेंडूत नाबाद १७४ धावांची तुफानी खेळी केली. सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी २१३ धावांची भागिदारी केली. भारताच्या गोलंदाजांनी चाहत्यांना निराश केले.
लंकेच्या ३४९ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय फलंदाज धावसंख्या वाढविण्याच्या घाईत बाद होताना दिसले. कर्णधार कोहलीनेही निराशाजनक कामगिरी केली. भारतीय संघातून अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला सर्वाधिक म्हणजे फक्त ४९ धावा करता आल्या. इतर सर्व फलंदाज अर्धशतकही गाठू शकले नाहीत व संपुर्ण संघ १८७ धावांत तंबूत परतला. तिरंगी मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव असून मालिकेच्या क्रमावारीत भारत तिसऱया स्थानावर आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान टीकून राहण्यासाठी टीम इंडियाला पुढील सामना जिंकणे गरजेचे आहे. भारताचा पुढील सामना यजमान वेस्ट इंडिज संघाविरुद्ध रंगणार आहे.