भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या गोलंदाजी व अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे. त्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो कशी कामगिरी करतो याची उत्कंठा निर्माण झाली आहे. या मालिकेला कोलकाता येथे गुरुवारपासून प्रारंभ होत आहे.

जडेजाने आतापर्यंत ३२ कसोटी सामन्यांमध्ये १५५ बळी टिपले असून १,१३६ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत इंग्लंडचा जेम्स अँडरसन आघाडीवर असून त्याच्यापेक्षा १२ गुणांनी जडेजा मागे आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत आघाडीच्या स्थानावर असलेल्या बांगलादेशच्या शकीब अल हसनपेक्षा जडेजा ९ गुणांनी पिछाडीवर आहे. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर जडेजाने चांगले यश मिळविले, तर तो अव्वल स्थानावर झेप घेऊ शकतो.

भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही फलंदाजीत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यासाठी ही मालिका उपयुक्त ठरणार आहे. पाचव्या स्थानावर असलेल्या डेव्हिड वॉर्नरपेक्षा तो एक गुणाने मागे आहे. कोहलीबरोबरच लोकेश राहुल (आठवे स्थान), अजिंक्य रहाणे (नववे स्थान) यांनाही आपल्या क्रमवारीत बढती घेण्याची संधी आहे. गोलंदाजीत रविचंद्रन अश्विन हा चौथ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमी (१९वे स्थान), उमेश यादव (२७वे स्थान), ईशांत शर्मा (२९वे स्थान) व भुवनेश्वर कुमार (३७वे स्थान) हे पहिल्या ४० खेळाडूंमध्ये आहेत.

कसोटी क्रमवारीत अग्रस्थान राखण्याचे ध्येय -रहाणे

कोलकाता : श्रीलंकेतील यापूर्वीच्या मालिकेत एकतर्फी विजय मिळवला असला तरीही मायदेशात होणाऱ्या मालिकेत आम्ही कसोटी क्रमवारीतील अग्रस्थान टिकविण्यासाठी सर्वोच्च कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितले.

श्रीलंकेतील दौऱ्यात भारतीय संघाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. या पाश्र्वभूमीवर भारतीय संघ आगामी मालिकेत वर्चस्व राखणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारत व श्रीलंका यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० असे प्रत्येकी तीन सामने होणार आहेत.

रहाणे म्हणाला, ‘कसोटीत अव्वल स्थान टिकविण्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी ही मालिका उपयुक्त ठरणार आहे. आफ्रिकेतील मालिका पूर्णपणे वेगळ्या वातावरणात होणार असली, तरीही श्रीलंकेविरुद्धची कामगिरी आम्हाला पूर्वतयारी म्हणून लाभदायक होईल. श्रीलंकेच्या खेळाडूंना दुय्यम मानत नाही. प्रतिस्पर्धी संघाची व्यूहरचना कशी असेल यापेक्षा आमची बलस्थाने व कमकुवत दुवे कोणती यावरच सध्या लक्ष केंद्रित केले आहे.’