जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी तो बलात्काराच्या एका खटल्यामुळे चर्चेत होता. काही दिवसांपूर्वीच रोनाल्डोची अमेरिकेतील न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर आता रोनाल्डो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर असलेल्या क्रिस्टियानोच्या बुगाटी व्हेरॉन कारला अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी स्पेनमधील मेयोर्का शहरातील एका घराच्या फाटकाजवळ या गाडीला अपघात झाला. रोनाल्डो सध्या आपल्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद लुटत असून त्याने समुद्रमार्गे ही गाडी स्पेनला मागवली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, अपघाताच्यावेळी रोनाल्डो किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही या गाडीमध्ये नव्हते. रोनाल्डोचा एक कर्मचारी ही गाडी चालवत होता. एका वळणावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीला अपघात झाला. अपघातात गाडीच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रोनाल्डोचा कर्मचारी मात्र, सुरक्षित आहे. अपघात झालेल्या बुगाटी व्हेरॉन गाडीची किंमत १७ कोटीरुपयांच्या आसपास असल्याचे म्हटले जात आहे. द सनच्या वृत्तानुसार, रोनाल्डोकडे आणखी एक बुगाटी कार आहे. त्या कारची किंमत ८१ कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारचा कमाल वेग २३६ ताशी किलोमीटर असून ती २.४ सेकंदात ० ते ६२ किमी वेग पकडू शकते. हेही वाचा - बूम बूम आफ्रिदीचे भारतीय क्रिकेटबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाला… रोनाल्डो सध्या आपली जोडीदार आणि पाच मुलांसह १० दिवसांच्या सुट्टीवर गेल्याचे सांगण्यात येत आहे. तो राहत असलेल्या, समुद्रकिनाऱ्यावरील व्हिलाचे एका रात्रीचे भाडे सुमारे १० लाख रुपये आहे.