दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने गुरुवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातून माघार घेतली आहे. खांद्याच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे बरा न झाल्याने स्टेनला खेळवण्याचा धोका आम्ही पत्करणार नाही, असे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी स्पष्ट केले.

दक्षिण आफ्रिकेचा कसोटीतील सर्वाधिक बळी मिळवणारा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला इंडियन प्रीमियर लीगदरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. ३५ वर्षीय स्टेनच्या दुखापतीवर गिब्सन बारकाईने लक्ष ठेवून आहोत. ‘‘स्टेनच्या दुखापतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. रविवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी तो पूर्णपणे बरा होईल, अशी आशा आहे. भारताविरुद्ध ५ जून रोजी होणाऱ्या सामन्यात तो पूर्ण क्षमतेने खेळेल, असा विश्वास आहे,’’ असेही गिब्सन यांनी सांगितले.

ते म्हणाले की, ‘‘स्टेन पूर्णपणे सावरला नसून सहा आठवडे रंगणाऱ्या या स्पर्धेत त्याला खेळवून आम्ही कोणताही धोका पत्करणार नाही. त्याची दुखापत अधिक चिघळू नये, याची काळजी आम्ही घेत आहोत.’’ दक्षिण आफ्रिकेच्या १५ जणांच्या संघात स्टेनचा समावेश असला तरी त्याने आतापर्यंत इंग्लंडमध्ये येऊन एकही चेंडू टाकलेला नाही. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात तो मैदानावरही उतरला नव्हता.

स्टेनच्या माघारीमुळे आता आफ्रिकेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कॅगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी यांच्यावरील दबावात भर पडली आहे.