जगात काही व्यक्ती अशा असतात की त्या आपल्या बिनधास्त वर्तनाचे समर्थन करतात आणि आपल्या विधानांशी तसेच मतांशी ठाम असतात. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू व ख्यातनाम समालोचक टोनी ग्रेग अशाच व्यक्तींमध्ये मोडणारे होते. वादग्रस्त विधानांचे जोरदार समर्थन करणाऱ्या या खेळाडूने अष्टपैलू खेळाच्या जोरावर आपली क्रिकेट कारकीर्द गाजविली.
 सांघिक खेळामध्ये आपल्या संघाला एकहाती कामगिरीच्या जोरावर विजय मिळवून देणारे फारच थोडे क्रिकेटपटू असतात. ग्रेग यांनी आपल्या संघाला अनेक वेळा केवळ आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर विजय मिळवून दिले. वयाच्या १९व्या वर्षी जरी त्यांच्या प्रथम दर्जाच्या क्रिकेट कारकिर्दीस सुरुवात झाली तरी प्रत्यक्ष कसोटी व एकदिवसीय सामन्यांमध्ये कारकीर्द सुरुवात करण्याची संधी त्यांना वयाच्या २६व्या वर्षी मिळाली. एवढय़ा उशिराने त्यांनी कारकिर्दीस सुरुवात केली तरी त्यांनी संपूर्ण कारकीर्द गाजवली. सहा फूट सहा इंच उंच असलेल्या ग्रेग यांनी ५८ कसोटींमध्ये भाग घेताना ४०.४३च्या सरासरीने ३५९९ धावा केल्या. त्यामध्ये त्यांनी आठ शतके व २० अर्धशतके टोलविली. त्यामध्ये सर्वाधिक १४८ धावांची खेळी त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध केली. मध्यमगती व फिरकी गोलंदाजी करण्यात ते माहीर होते. त्यांनी कसोटींमध्ये १४१ गडी बाद केले. पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची किमया त्यांनी सहा वेळा केली. एकाच सामन्यात दहा किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याचा पराक्रम त्यांनी दोन वेळा केला. एकाच डावात ८८ धावांमध्ये आठ बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. कसोटीत त्यांनी ८७ झेल घेताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणूनही नाव कमाविले.
कसोटीच्या तुलनेत एकदिवसीय सामन्यांत ते फारसे चमकले नाहीत. २२ सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करताना त्यांनी १६.२१च्या सरासरीने २६९ धावा केल्या. सर्वाधिक ४८ धावांची त्यांनी खेळी केली. या सामन्यांमध्ये त्यांनी १९ विकेट्स घेतल्या.
ग्रेग यांचे वडील स्कॉटिश तर आई दक्षिण आफ्रिकेची. लहानपणापासून अतिशय हुशार असलेल्या टोनी यांनी डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावे, अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती. टोनी शिकत असलेल्या क्वीन्स महाविद्यालयात इंग्लंडच्या क्रिकेट व्यवस्थापनाचे अनेक नामवंत प्रशिक्षक मुलांना क्रिकेट शिकवीत असत. टोनी यांची उंची व धिप्पाड शरीरयष्टी पाहून त्याला क्रिकेटमध्ये घेतले पाहिजे, असा मोह या प्रशिक्षकांना झाला नाही तर नवलच. त्यांनी टोनीला ससेक्स संघाच्या निवड चाचणीत भाग घेण्याचे सुचविले. तेथे त्यांनी आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. लगेचच त्यांची ससेक्स संघाकडून खेळण्यासाठी निवड झाली. टोनी यांनी तेथूनच आपण यापुढे क्रिकेटमध्ये कारकीर्द करणार असल्याचे आपल्या वडिलांना कळविले आणि शिक्षणास रामराम ठोकला. त्या वेळी टोनी हे केवळ १९ वर्षांचे होते.
ग्रेग यांच्या विधानांमुळे व वर्तणुकीमुळे अनेक वेळा वाद निर्माण झाले मात्र प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. १९७४मध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिजचा दौरा केला. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी विंडीजचा बर्नार्ड ज्युलियनने शेवटच्या चेंडूवर फटका मारला आणि तो खेळ संपला म्हणून अल्विन कालीचरण याच्या समवेत पॅव्हेलियनकडे निघाला. ग्रेग यांनी हा चेंडू अडवून कालीचरणला धावबाद केले. पंचांनीही कालीचरण बाद झाल्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे प्रेक्षकांनी मैदानात धाव घेत गोंधळ घातला. ग्रेग यांनी आपले अपील मागे घेतले व कालीचरणला पुन्हा दुसऱ्या दिवशी खेळावयास पाचारण केले. त्यांची ही खिलाडूवृत्ती संघास मारक ठरली. कारण त्यानंतर कालीचरण यांनी शतक टोलवीत संघास विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियात कॅरी पॅकर यांनी खेळाडूंकरिता भरघोस आर्थिक मोबदला मिळवून देणारी स्पर्धा सुरू केली. त्या वेळी ‘पॅकर यांची सर्कस’ अशी टीका सुरू झाली. मात्र ग्रेग यांनी या स्पर्धेचे जोरदार समर्थन केले. एवढेच नव्हे तर या स्पर्धेत स्वत: सहभागी होताना आपल्या अनेक खेळाडूंनाही त्यांनी या स्पर्धेकडे वळविले. हे करताना आपले कर्णधारपद गमावल्याची काळजी त्यांनी केली नाही. खेळाडूंना आर्थिक मोबदला आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते समालोचनाकडे वळले. सुरेख निवेदन शैली, प्रभावी व स्पष्ट उच्चार, खेळाडूंविषयीचा सखोल गृहपाठ आणि विनोदी शब्दांची उत्कृष्ट शैली यामुळे त्यांनी क्रिकेटमधील ही नवी भूमिकाही गाजविली. जगातील अनेक नामवंत चॅनेल्सनी त्यांना आपल्याकडे काम करण्याची संधी दिली.
भारतात आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यानंतर या स्पर्धेचे सर्वोत्तम शैलीत समालोचन करीत ही स्पर्धा लोकांपर्यंत पोहोचविण्यात सिंहाचा वाटा उचलला. स्पर्धेचे समालोचक असतानाही त्यांनी आयपीएलच्या संयोजकांवर व भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर टीका करण्याची संधी सोडली नाही. माणसाने परखड असले पाहिजे व कोणाचे मिंधे असू नये, असेच त्यांचे ठाम मत होते.
लागोपाठच्या सामन्यांमध्ये समालोचन करताना सतत बोलावे लागते व त्यातूनच त्यांना फुप्फुसाचा कर्करोग झाला. या आजारातून ते पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकले नाहीत.
आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मैदान गाजविणारे व मैदानाबाहेर समालोचनामुळे क्रिकेट चाहत्यांना आपलेसे करणाऱ्या ग्रेग यांनी अवघ्या ६६व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. जणू काही दुसऱ्या जगातील लोकांना आपलेसे करून घेण्यासाठीच!