संदीप कदम

भारताने २००७ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. त्यानंतर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाला. त्यामुळे राष्ट्रीय संघापलीकडे खेळाडूंना व्यासपीठ मिळाले आणि त्यांचे अर्थकारण सुधारले. गेली काही वर्षे प्रायोगिक स्तरावर महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धा घेणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुढील वर्षीपासून महिला ‘आयपीएल’ची घोषणा केली आहे. यात सहा-सात संघ अपेक्षित आहेत. महिला ‘आयपीएल’च्या आव्हानाला सामोरे जाताना काही महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर आहेत.

भारताने १९८७ मध्ये पुरुषांच्या रिलायन्स विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते; पण त्याआधी १९७८ मध्ये भारताच्या यजमानपदाखाली महिलांचा विश्वचषक झाला होता. मात्र, तरीही भारताला महिला क्रिकेटविश्वात आपला ठसा उमटवण्यासाठी बरीच वर्षे गेली. २०१७ मध्ये भारतीय महिलांनी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली; पण जेतेपदाने हुलकावणी दिली. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस सुरू झाले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना ओळख मिळाली; पण २००५ मध्येही भारतीय संघ एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषकात उपविजेता ठरला होता. याशिवाय ट्वेन्टी-२० प्रकारातही भारताने २०२० मध्ये उपविजेतेपद पटकावले.

स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्यासारख्या भारतातील अनेक महिला खेळाडू इंग्लंड (ट्वेन्टी-२० ब्लास्ट) आणि ऑस्ट्रेलियाच्या (बिग बॅश लीग) ट्वेन्टी-२० लीगमध्ये सहभागी होतात आणि त्यात चमक दाखवतात. ‘बीसीसीआय’ने २०१८ मध्ये ट्रेलब्लेजर्स आणि सुपरनोव्हाज यांच्यात सामना ठेवला होता. या लढतीत सुपरनोव्हाजने बाजी मारली. यानंतर महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ‘बीसीसीआय’ने तीन संघांची महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धा २०१९ मध्ये पुरुषांच्या ‘आयपीएल’च्या बादफेरीदरम्यान सुरू केली. गतवर्षी ही स्पर्धा होऊ शकली नाही. यंदा २३ मेपासून ही स्पर्धा होणार आहे. महिला ट्वेन्टी-२० चॅलेंजमध्ये ट्रेलब्लेजर्स, सुपरनोव्हाज आणि व्हॅलोसिटी हे संघ खेळतात.

‘आयपीएल’साठी सज्ज होणाऱ्या महिला क्रिकेटच्या सद्य:स्थितीकडे पाहिल्यास पुरुषांच्या लीगमधील व्यावसायिकपणा महिलांच्या लीगमध्ये आणण्यासाठी ‘बीसीसीआय’ला अनेक मुद्दय़ांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. प्रशिक्षक, सरावाच्या सुविधा, वयोगटाच्या क्रिकेट स्पर्धाची वानवा अशा अनेक कारणांमुळे भारतीय महिला क्रिकेटची प्रगती वेगाने होऊ शकलेली नाही. ‘आयपीएल’मध्ये जागतिक स्तरावरील अव्वल परदेशी खेळाडूंचा सहभाग आणि अर्थकारण उंचावणारे घटक यांची यथोचित अनुकूलता लाभल्यास महिला ‘आयपीएल’सुद्धा यशस्वी होऊ शकेल.

१६ वर्षांखालील स्पर्धा आवश्यक!

 २०१७ मध्ये भारतीय संघाने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली, तेव्हापासून महिला क्रिकेटला अधिक प्रोत्साहन मिळू लागले. यानंतर महिला खेळाडूंना ‘बीसीसीआय’ने करारबद्धही केले. यामुळे खेळाडूंना त्याचा फायदा झाला. स्थानिक क्रिकेटमध्येही अनेक खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. महिला क्रिकेटच्या स्पर्धा काहीशा मर्यादित आहेत. त्यामुळे लवकरच ‘बीसीसीआय’ने १६ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन करावे असे मला वाटते. सध्या मर्यादित क्रिकेट स्पर्धा अस्तित्वात आहेत. ‘आयपीएल’ सुरू झाल्यास त्याचा फायदा हा खेळाडूंनाच होणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांत महिलांच्या लीग सुरू आहेत. यामुळे भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून मुलींना चांगले व्यासपीठही उपलब्ध होणार आहे. त्याचा परिणाम त्यांच्या खेळावर होणार आहे. यासह महिला खेळाडूंना आर्थिकदृष्टय़ाही फायदा होऊ शकतो. येणाऱ्या काळात या खेळाडू क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्यासाठी पुढे येऊ शकतात. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यावरही अनेक पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध असतील.

– शुभांगी कुलकर्णी, माजी कर्णधार

महिला क्रिकेटचा दर्जा उंचावेल!

महिला ‘आयपीएल’ भारतीय महिला क्रिकेटसाठी क्रांतिकारक ठरेल. यामुळे भारतातील महिला क्रिकेटचा दर्जा आणखी उंचावेल. या स्पर्धेमुळे भारतातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. यामार्फत महिला खेळाडूंना आर्थिकदृष्टय़ाही फायदा होईल. महिलांचे ‘आयपीएल’ सुरू झाल्यानंतर स्थानिक खेळाडूंचा कसा फायदा होईल याबाबत योजना आखली पाहिजे. त्यामुळे महिला क्रिकेटचा पाया आणखीन भक्कम होण्यास मदत होईल. आता ‘बीसीसीआय’कडूनही महिला क्रिकेटला चांगले प्रोत्साहन मिळत आहे.  यापूर्वी केवळ दोनच स्पर्धा होत असत. आता १९ वर्षांखालील, २३ वर्षांखालील आणि वरिष्ठ गटाच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय स्पर्धा खेळाडूंना खेळण्यास मिळतात. सध्या महिला खेळाडूंना कामगिरी करण्यासाठी चांगले व्यासपीठही उपलब्ध आहे.

– वर्षां नागरे, माजी क्रिकेटपटू