आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ २ जून रोजी मुंबईहून रवाना होईल. सध्या भारतीय खेळाडू मुंबईत कडक बायो-बबलमध्ये राहत आहेत. बायो बबलमध्ये असताना भारताचा कर्णधार विराट कोहलीही फुटबॉल खेळण्याचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर कोहलीने एक व्हिडिओ शेअर केला. यात तो फ्री-किकवर गोल करण्यास असमर्थ ठरतो. या व्हि़डिओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. विराटने या व्हि़डिओला ‘अॅक्सि़डेंटल क्रॉसबार चॅलेंज’ असे नाव दिले.

हेही वाचा – “माझ्यात आणि व्यंकटेश प्रसादमध्ये कोणताही वाद झाला नव्हता”

कोहलीची ही कीक पाहून फुटबॉलर सुनील छेत्रीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ”चॅम्प सर्व कोचिंग सत्राचे एकच बिल पाठवू की तू सुलभ हप्त्यांमध्ये परतफेड करशील?”, असे छेत्रीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. या व्हिडिओमध्ये कोहलीने किक केलेला फुटबॉल क्रॉसबारला लागतो. चाहत्यांनाही हा व्हिडिओ खूप आवडला असून अनेकांनी विराटच्या फुटबॉल कौशल्याची स्तुती केली आहे.

 

इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय संघ क्वारंटाइन असेल, त्यानंतर ते सराव करणार आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८ जूनपासून साऊथम्प्टन येथे सुरू होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारताला इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळावी लागणार आहे.

विराटसाठीही ही कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम लढत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कोहलीच्या नेतृत्वात संघालाही यंदा टी-२० विश्वचषक खेळायचा आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून कोहलीसाठी हे वर्ष खूपच आव्हानात्मक असेल.

हेही वाचा – IPL खेळण्याचं स्वप्न पाहणारा मोहम्मद आमिर आता ‘या’ टी-२० लीगमध्ये खेळणार