मी जरी काही दिवसांसाठी क्रिकेटपासून दूर गेलो होतो तरी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर सेट होण्यासाठी मला वेळ लागणार नाही असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे. भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी आज मुंबईमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये तो बोलत होता.

मागील अनेक दिवसांपासून आशियामध्येच क्रिकेट खेळणारा भारतीय संघ बऱ्याच महिन्यांनंतर वेगळ्या खेळपट्ट्यावर खेळणार असल्याने भारतीय संघावर चांगल्या कामगिरीचा दबाव असेल अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्याबद्दल प्रश्न विचारला असता विराटने आम्ही तिथे कोणाला काहीतरी सिद्ध करुन दाखवण्यासाठी जात नसल्याचे सांगितले. आम्ही तिथे क्रिकेट खेळण्यासाठी जात असून आमच्या देशासाठी आम्ही शंभर टक्के कामगिरी करु असा विश्वास विराटने व्यक्त केला.

अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर लग्न करण्यासाठी बीसीसीआयकडे श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय तसेच टी-ट्वेन्टी सामान्यांमधून विराटने विश्रांती मागितली होती. इतक्या मोठा विश्रांती नंतर पुनरागमन कठीण वाटतं नाही का असा प्रश्न पत्रकारांनी केला असता विराटने क्रिकेट माझ्या रक्तात असल्याचे सांगितले. मी ज्या कारणासाठी विश्रांती घेतली होती ते माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. तसेच पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरून चांगली कामगिरी करणे मला जास्त कठीण जाणार नाही कारण माझ्या रक्तातच क्रिकेट असल्याचे विराट म्हणाला.

कालच मुंबईमध्ये विराट आणि अनुष्काचे रिसेप्शन पार पडले. यावेळी अनेक बड्या बॉलिवूड सेलिब्रिटीजबरोबरच भारतीय क्रिकेट संघातील आजी माजी खेळाडू उपस्थित होते.

आमच्यासाठी मोठे आव्हान

या वेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रीही उपस्थित होते. भारतीय संघातील खेळाडू या दौऱ्यासाठी तयार असून हे आमच्यासाठी मोठे आव्हान असणार असल्याची कल्पना आम्हाला आहे असे शास्त्री यांनी सांगितले. मात्र आम्ही नक्की चांगली कामगिरी करु असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पाहा काय म्हणाले हे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देताना…