आयसीसी टी-२० विश्वचषक-२०२१ स्पर्धेमध्ये आज भारत आपल्या मोहिमेची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. दोन्ही शेजारी देश दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर काही वेळेत समोरासमोर असतील. भारत आणि पाकिस्तान सध्या फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांशी भिडतात.

आज तकच्या वृत्तानुसार, १९५२ मध्ये दिल्लीत झालेल्या कसोटी सामन्याने दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांची सुरुवात झाली. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान दरम्यान अनेक मनोरंजक सामने झाले आहेत, विशेष गोष्ट अशी आहे, की भारत आणि पाकिस्तान या दोघांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे तीन खेळाडू होते. याचे कारण म्हणजे १९४मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानसाठी २३ कसोटी सामने खेळले गेले.

कोण होते हे खेळाडू?

अब्दुल हफीज कारदार:

अब्दुल हफीज कारदार हे पाकिस्तान क्रिकेटचे जनक मानले जातात. कारदार भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले, त्यांनी फाळणीपूर्वी भारतासाठी ३ कसोटी सामने आणि १९४७ मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानसाठी २३ कसोटी सामने खेळले.

पाकिस्तानच्या पहिल्या २३ कसोटी सामन्यांमध्ये कारदार यांनी संघाचे नेतृत्व केले. त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध १९५८ मध्ये खेळला. विशेष गोष्ट म्हणजे त्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी पाकिस्तानला कसोटी खेळणाऱ्या प्रत्येक संघाविरुद्ध विजय मिळवून दिला. २६ कसोटी सामन्यांमध्ये कारदार यांनी २३.७६च्या सरासरीने ९२७ धावा केल्या आणि २१ बळी घेतले.

हेही वाचा – भारताचा ‘डाय हार्ट फॅन’ सुधीरनं दिल्या संघाला शुभेच्छा; म्हणाला, “पाकिस्तानविरुद्ध…!”

अमीर इलाही:

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंमध्येही अमीर इलाहीचे नाव नोंदवले गेले आहे. इलाही यांनी मध्यम वेगवान गोलंदाज म्हणून आपली कारकीर्द सुरू केली, पण नंतर ते लेगस्पिनर बनले. त्यांनी १९४७ मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून एकमेव कसोटी खेळली. फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले आणि १९५२ मध्ये पाकिस्तान संघाकडून कसोटी पदार्पण केले. त्याच्या कारकिर्दीत, इलाही यांनी एकूण ६ कसोटी सामने खेळले आणि ७ विकेट्स नावावर केल्या.

गुल मोहम्मद:

एक चमकदार फलंदाज असण्याव्यतिरिक्त, गुल मोहम्मद एक महान गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना १९४६मध्ये वरिष्ठ संघात स्थान मिळाले. त्यांनी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पदार्पण केले. यानंतर गुल मोहम्मद यांनी भारतासाठी आणखी ७ कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला. या दरम्यान, त्यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध दोन कसोटी सामनेही खेळले.

त्यानंतर गुल मोहम्मद यांनी १९५५ मध्ये पाकिस्तानात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. यानंतर, ते कराची येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९५६ च्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाचा एक भाग बनले, पाकिस्तानने हा सामना ९ गडी राखून जिंकला. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना गुल मोहम्मदचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. गुल मोहम्मद यांनी ९ कसोटी सामन्यांमध्ये २०५ धावा करण्यासोबतच दोन विकेट्स घेतल्या.