महिला टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात भारताची धडाकेबाज सलामीवीर शफाली वर्मा हिने अप्रतिम खेळ केला. एकीकडे झटपट गडी बाद होताना शफालीने एक बाजू लावून तर धरली. त्याचसोबत तिने धावगतीही कायम राखली, पण अर्धशतकाने मात्र तिला हुलकावणी दिली. शफालीने ३४ चेंडूत ४६ धावांची झंजावाती खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ३ षटकार लगावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. फटकेबाज सुरूवात करणारी स्मृती मानधना बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट लावून त्रिफळाचीत झाली आणि भारताला पहिला धक्का बसला. तिने ८ चेंडूत ११ धावा केल्या. स्मृती लवकर बाद झाल्यावर शफाली वर्मा आणि तानिया भाटीया यांनी दमदार फटकेबाजी करत भारताला सातव्या षटकात अर्धशतकी मजल मारून दिली. यष्टीरक्षक तानिया भाटीया फटकेबाजी करताना झेलबाद झाली आणि भारताला दुसरा धक्का बसला. तानियाने २५ चेंडूत २३ धावा केल्या.

धावगती वाढवण्यासाठी खेळपट्टीवर येताच मुंबईकर जेमिमाने फटकेबाजी सुरू केली पण ८ चेंडूत १० धावा करून ती माघारी परतली. गेल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार हरमनप्रीतला या सामन्यातही सूर गवसला नाही. केवळ १ धाव करून ती बाद झाली. धडाकेबाज खेळी करणारी सलामीवीर शफाली वर्मा हिला अर्धशतकाने हुलकावणी दिली. तिने ४६ धावा केल्या.

अनुभवी वेदा कृष्णमूर्ती फटका खेळताना चेंडू तिच्या पायावर आदळला. पंचांनी तिला बाद ठरवले नाही, त्यामुळे न्यूझीलंडने DRS चा आधार घेतला. त्यात तिला पायचीत घोषित करण्यात आले. ११ चेंडूत ८ धावा करणारी दिप्ती शर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाली आणि भारताला सातवा धक्का बसला. अखेर आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या राधा यादवने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत भारताला १३३ धावांपर्यंत मजल मारून दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup shafali verma splendid performance but misses half century in ind vs nz vjb
First published on: 27-02-2020 at 11:33 IST