पतियाळा: ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग तूर याने सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखत राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली.

तजिंदरने गेल्या सोमवारी इंडियन ग्रां. प्री. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत २१.९४ मीटर अशी कामगिरी करून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. त्यासह त्याने ऑलिम्पिकचे तिकीटही निश्चित केले होते. मंगळवारी त्याने २१.१० मीटर गोळाफेक करत सुवर्णपदक प्राप्त केले. ऑलिम्पिकसाठीचा पात्रता निकष २१.१० मीटर इतका असल्यामुळे तजिंदरने आठ दिवसांच्या अंतरात दोन वेळा ही कामगिरी साकारली.

तजिंदरने मंगळवारी पाचही प्रयत्नांत २०मीटरपेक्षा जास्त अंतरावर गोळाफेक केला. पंजाबच्या करणवीर सिंगने १९.३३ मीटर अशी कामगिरी करत रौप्यपदक मिळवले. राजस्थानच्या वनम शर्मा याने १८.३३ मीटरसह कांस्यपदक पटकावले.

महिलांच्या भालाफेक प्रकारात राष्ट्रीय विक्रमवीर अन्नू राणी हिला ६४ मीटरचा ऑलिम्पिक पात्रता निकष पार करण्यात अपयश आले. तिने ६२.८३ मीटर अशी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. मात्र जागतिक क्रमवारीच्या आधारे तिला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्राच्या रिले संघाने ४ बाय १०० मीटर शर्यतीचे जेतेपद पटकावले. हर्ष अजय राणा, पांडुरंग भोसले, ए. प्रकाश खोत आणि एस. राजेश नैताम यांनी ४१.२३ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले.