क्रिकेट खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर यायचे असेल, तर त्या आधी अफगाणिस्तनाशी क्रिकेट खेळावे लागेल, अशी अजब अट बीसीसीआयने दौऱ्यावर येणाऱ्या संघासाठी ठेवली आहे. बीसीसीआयचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे ही घोषणा केली. अफगाणिस्तान संघाला आंतरराष्ट्रीय संघांशी अधिकाधिक सामने खेळता यावेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानचा संघ एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी भारतात येणार आहे. १४ ते १८ जून दरम्यान हा सामना बंगळुरू येथे होणार आहे. त्या आधी चौधरी दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांवर चर्चा करण्यासाठी काबूल येथे गेले आहेत. त्यावेळी भारतात सामना खेळायचा असेल, तर त्या आधी किमान १ सराव सामना अफगाणिस्तानशी खेळावा लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.

चौधरी पुढे म्हणाले की अफगाणिस्तानच्या क्रिकेट मंडळाने मला येथे आमंत्रित केले, त्याबाबत मी मंडळाचे अध्यक्ष माशल यांचा आभारी आहे. कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर अफगाणिस्तान पहिला कसोटी सामना भारतासोबत खेळणार आहे. हा सामना अफगाणिस्तानसाठी ऐतिहासिक आहे. आणि हा सामना भारताबरोबर आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही ही संधी गमावू इच्छित नाही.

क्रिकेटमुळे दोन देशांमधील ऋणानुबंध वाढतील आणि शांततेचे संबंध प्रस्थापित होतील. आयपीएलमुळे अफगाणिस्तानचे खेळाडू भारतात लोकप्रिय आहेत. भारतीय क्रिकेटप्रेमी त्यांचा आदर करतात आणि त्यांच्यावर प्रेम करतात. येत्या काळात हे प्रम आणखी वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

याबाबत अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष माशल यांनी बीसीसीआयचे आभार मानले. अफगाणिस्तान बांगलादेश विरुद्ध डेहराडून येथे होणाऱ्या टी२० मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. अफगाणिस्तानला डेहराडून आणि ग्रेटर नोएडा येथे बीसीसीआयने स्टेडियम उपलब्ध करून दिले, याबाबतही त्यांनी आभार मानले.