उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळून रविवारी १२५ हून अधिक मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. आतापर्यंत काही मृतदेह सापडले असून इतरांचा शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हिमकडा कोसळल्याने आलेल्या प्रलयात अलकनंदा नदीवरील जलविद्युत केंद्रे आणि ऋषीगंगा नदीवरील लघू जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. या भयानक बातमीमुळे रविवारी संपूर्ण देश हादरला. भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याच्यापर्यंतदेखील ही बाब पोहोचली, तेव्हा त्याने एक निर्णय घेत माणूसकीचं दर्शन घडवून दिले.

पाहा फोटो >> हाहाकार आणि जीव वाचवण्याची धडपड; पहा जलप्रलयानंतरची झोप उडवणारी दृश्य

नंदादेवी हिमकड्याचा काही भाग सकाळी कोसळल्यानंतर धौलीगंगा, ऋषीगंगा आणि अलकनंदा या गंगेच्या उपनद्यांना रविवारी दुपारी महापूर आला. त्यामुळे त्यांच्या काठांवरील डोंगराळ भागांत हाहाकार उडाला. या प्रलयामुळे ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’चा (एनटीपीसी) धौलीगंगा नदीवरील तपोवन-विष्णूगड जलविद्युत प्रकल्प आणि ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. या प्रलयातील बाधितांबद्दल समजताच पंतने एक ट्विट केलं आणि त्यातच सुरू असलेल्या कसोटी सामन्याचे संपूर्ण मानधन प्रलयबाधितांना देण्याची घोषणा केली. तसेच, इतरांनीही या बाधितांनी सढळ हस्ते मदत करावी, असं आवाहन त्याने केलं.

दरम्यान, रविवारच्या दिवशी कसोटी सामन्यात पंतने मैदानावरही चाहत्यांची मनं जिंकली. ऋषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली, पण शतकाने त्याला हुलकावणी दिली. त्याने ८८ चेंडूत ९१ धावांची खेळी केली. त्यात ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.