मुंबई : मुंबई महानगरपालिकेने खार भुयारी मार्गावर (खार सब वे) प्रस्तावित केलेल्या उन्नत मार्गाला सांताक्रूझ व खारमधील रहिवाशांनी कडाडून विरोध केला आहे. येथील रहिवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी वांद्रे पश्चिममधील भाजपचे आमदार आशिष शेलार यांची शुक्रवारी भेट घेतली व प्रकल्पातील काही मुद्द्यांना विरोध केला व पर्यायी रस्त्याची मागणी केली. याप्रकरणी शेलार यांनी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. रहिवाशांच्या सूचनांचा अभ्यास करून पालिका प्रशासन या प्रकल्पाबाबत निर्णय घेणार आहे.
खार भूयारी मार्ग परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी याकरिता मुंबई महापालिका प्रशासनाने एक उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला असून स्थानिक रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. तब्बल २४०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून या प्रकल्पाच्या आरेखनात अनेक त्रुटी असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. रहिवाशांनी याप्रकरणी समाजमाध्यमावरून आवाजही उठवला होता. याच पार्श्वभूमीवर सांताक्रूझ पूर्व रहिवासी संघटना, मुंबई उत्तर मध्य जिल्हा मंच आणि खार रहिवासी संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार आशिष शेलार यांची भेट घेतली व हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. शेलार यांनी यासंदर्भात पालिका आयुक्तांशी चर्चा करून हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केल्याचे समाजमाध्यमांवरून सांगितले.
हेही वाचा…स्वच्छता मोहीम सुरूच राहणार, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची ग्वाही
या उन्नत मार्गामुळे खार सब वेसह सांताक्रूझ पूर्व पट्ट्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल असा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. या कामासाठी तब्बल २४०० कोटी रुपयांची निविदाही काढली. मात्र खार, सांताक्रुझमधील १४० हून अधिक इमारतींतील रहिवाशांनी या उन्नत मार्गाला विरोध दर्शविला आहे. पुलाचे चुकीचे संरेखन, उन्नत मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम परिसरात राहणाऱ्यांना याचा न होणारा फायदा इत्यादी मुद्दे उपस्थित करून ‘सांताक्रूझ ईस्ट रेसिडेंट असोसिएशन’ने विरोध केला आहे. हा उन्नत मार्ग खार सब वेवरून सांताक्रूझ पूर्व, व्ही.एन.देसाई रूग्णालय परिसरातून निवासी विभागातून पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत जाणार आहे. त्याला संघटनेचा विरोध असल्याची माहिती सांताक्रूझ पूर्व रेसिडेन्ट असोसिएशनच्या अध्यक्षा हेमलता मेहता यांनी दिली.
हेही वाचा…अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : आरोपींवर मोक्काअंतर्गत गुन्हा
दरम्यान, रहिवाशांच्या हरकती प्रशासनाने ऐकून घेतल्या असून त्यांनी पर्यायी मार्गही सुचवला आहे. रहिवाशांच्या सूचनांचा प्रशासन विचार करेल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. रहिवाशांच्या सूचनांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.