जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका बीसीसीसीआय सह बहुतांश क्रिकेट बोर्डांनाही बसला. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. लॉकडाउन पश्चात क्रिकेट मालिका पुन्हा सुरु करण्यासाठी आयसीसीने काही नवीन नियम आखून दिले आहेत. ज्यामध्ये गोलंदाजांना सामन्यादरम्यान चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करण्याची मनाई आहे. एखाद्या खेळाडूने असं केल्यास पंच त्याला समज देऊ शकतात. एका संघाला पंच किमान दोन वेळा समज देऊ शकतात. परंतू एखाद्या खेळाडूकडून वारंवार हा प्रकार होत असेल तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला दंड म्हणून प्रतिस्पर्धी संघाला ५ धावा बहाल करण्यात येतील. तसेच थुंकीचा वापर झाल्यास चेंडू स्वच्छ करवून घेण्याची जबाबदारीही पंचावर राहणार आहे. हे सर्व नियम तात्पुरते असल्याचंही आयसीसीने म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसीसीच्या या निर्णयाचा वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजांवर फारसा फरक पडणार नाही असं युवा गोलंदाज दिपक चहरने म्हटलंय. तो Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता. “आयसीसीच्या या निर्णयाचा फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. पांढरा चेंडू हा फार कमी कालावधीसाठी स्विंग होत असतो, म्हणजे सुरुवातीची २-४ षटकं…टी-२० क्रिकेटबद्दल बोलणार असू तर सर्वांना माहिती आहे की खेळपट्टी पहिल्या ३-४ षटकांपर्यंच चांगली असते आणि यादरम्यानच चेंडू अधिक स्विंग होतो. त्यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाज चेंडूला चकाकी आणण्याचा फारसा प्रयत्न करत नाहीत. कसोटी क्रिकेटमध्ये याची गरज लागते.”

आयसीसीचे हे नवीन नियम तात्पुरते असले तरीही पुढील काही दिवस सर्व गोलंदाजांना याचं पालन करावं लागणार आहे. कसोटी सामन्यात एखाद्या खेळाडूला करोनाची लक्षणं आढळत असतील तर त्याच्या जागेवर संघाला बदली खेळाडू खेळवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र यासाठी सामनाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांची संमती घेणं गरजेचं असल्याचं आयसीसीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. टी-२० आणि वन-डे क्रिकेटमध्ये बदली खेळाडूचा नियम लागू होणार नाही हे देखील आयसीसीने स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india pacer deepak chahar weighs in if saliva is temporarily stopped from shining the ball psd
First published on: 10-06-2020 at 17:54 IST