मालिकेतील दोन्ही सामने गमावल्यानंतर फिरोझ शाह कोटलावरचा तिसरा आणि अंतिम सामना जिंकण्याचे दडपण भारतीय संघावर असून त्यांनी शनिवारी गंभीर सराव केला. भारतीय संघाच्या सरावावर यावेळी नजर होती ती विक्रम राठोड आणि साबा करीम या दोन्ही निवड समितीच्या सदस्यांची.
दुपारी १२ च्या दरम्यान भारतीय संघ मैदानात दाखल झाला, त्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षणाचा सराव केला. पहिला तास क्षेत्ररक्षणाचा सराव केल्यावर स्टेडियमध्ये असलेल्या नेट्समध्ये भारतीय संघ दाखल झाला. यावेळी वेगवेगळ्या गटांमध्ये संघाने सराव केला. वीरेंद्र सेहवाग पहिल्यांदा फलंदाजीच्या सरावाला उतरला, त्यानंतर अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना सरावाला सुरूवात केली. सराव अनिवार्य नसल्याने युवराज सिंगने सरावाला दांडी मारली. सेहवागचा सराव झाल्यावर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांनी एकत्रितपणे सराव केला, यावेळी त्यांनी धाव काढण्याचाही सराव केला. धोनीने यावेळी इशांत शर्माला काही ‘बाऊन्सर’ टाकायला सांगितले आणि त्यावर त्याने आपला बचाव मजबूत केला.
गोलंदाजीमध्ये अशोक दिंडा, भुवनेश्वर कुमार आणि आर. अश्विन यांनी सुरुवातीपासूनच कसून सराव केला. रवींद्र जडेजा सरावाच्या वेळी जास्त गंभीर दिसला नाही. त्याने सुरुवातीला फलंदाजीचा थोडा सराव केला, पण फक्त नावापुरताच गोलंदाजीचा सराव केला. प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी यावेळी फक्त धोनीशी संवाद साधला, पण अन्य खेळाडूंना त्यांनी जास्त मार्गदर्शन केले नाही.