करोनामुळे अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडलेले IPL 2020 आता लवकरच खेळवले जाणार आहे. या स्पर्धेसाठी युनायटेड अरब अमिराती (UAE) ही जागा नक्की करण्यात आल्याचे IPL गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले आहे. स्पर्धेच्या तारखांबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही, पण साधारपणे २६ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर या काळात IPL 2020चे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. IPL च्या या हंगामाआधी एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळवण्यात यावी असा दबाव सध्या BCCI वर टाकला जातोय अशी माहिती आहे.

बंगलोर मिररच्या वृत्तानुसार, BCCIचे समभागधारक IPLच्या आधी एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळवण्यात यावी या मागणीवरून बोर्डावर दबाव टाकत आहेत. त्यातही दक्षिण आफ्रिका या संघाविरूद्ध ती क्रिकेट मालिका असावी असे समभागधारकांचे मत आहे. काही समभागधारक हे भारतीय क्रिकेट बोर्ड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड या दोन्ही मंडळांचे समभागधारक आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी आफ्रिका संघाला पसंती असल्याचे बोलले जात आहे. ऑगस्टमध्ये ही क्रिकेट मालिका खेळवावी असेही समभागधारकांचे मत आहे.

करोनाचा फटका बसल्याने भारत-द. आफ्रिका क्रिकेट मालिका रद्द करण्यात आली होती. तीन टी-२० सामन्यांची ती मालिका होती. त्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर इतर दोन सामने करोनाच्या तडाख्यामुळे रद्द करण्यात आले होते. भारताच्या वार्षिक वेळापत्रकात सध्या तरी अशा कोणत्याही क्रिकेट मालिकेचा उल्लेख करण्यात आलेला नाही, पण भारत-आफ्रिका क्रिकेट मालिका खेळवण्यात येण्याबाबत समभागधारक आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.