रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, पीट सॅम्प्रस यांच्यासारखे दिग्गज खेळाडू भारतात खेळणार म्हटल्यावर देशभरातल्या टेनिसप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. ही टेनिस मेजवानी अनुभवण्यासाठी मुंबई, पुणे, चेन्नई, बंगळुरूसह देशभरातल्या चाहत्यांनी इंदिरा गांधी स्टेडियमवर गर्दी केली होती. मात्र अवाच्या सव्वा रकमेची तिकिटे हातात असूनही अनेकांना मागच्या रांगांमधून, अस्वच्छ खुच्र्यावर बसून सामन्याचे ‘दूर’दर्शन घ्यावे लागल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी होती.
‘बुक माय शो’ या संकेतस्थळावर या तीन दिवसीय टेनिस मैफलीची तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली. किमान ३,५०० हजार ते ४९,००० रुपये असे तिकिटांचे दर होते. मात्र दहा हजारपेक्षा जास्त रक्कम देऊनही कोर्टपासून खूप दूरवर असणाऱ्या स्टँडमध्ये बसून सामने पाहावे लागल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. १७,००० रुपयांची तिकिटे खरेदी करून बंगळुरूची राजलक्ष्मी दिल्लीत केवळ फेडररला पाहण्यासाठी आली आहे. मात्र एवढी रक्कम देऊनही कोर्टपासून खूप दूर मागे असणाऱ्या स्टँडमधून सामने पाहावे लागल्याचे दु:ख ती लपवू शकली नाही.
‘‘खुच्र्यावर धुळीची पुटे होती. कोर्ट दूर असल्याने मोठय़ा पडद्यावर घडामोडी पाहण्यातच समाधान मानावे लागले. एवढय़ा रकमेच्या तिकिटात खानपानाची कोणतीही सुविधा नव्हती. तिकिटाव्यतिरिक्त दिल्लीला येणे-जाणे आणि राहण्याचा खर्चही करायचा आहे. त्यामुळे तीन दिवसांची मेजवानी चांगलीच महागात पडली,’’ असे राजलक्ष्मीने सांगितले. ‘‘१५,००० रुपयांचे तिकीट खरेदी करून लांबून सामने पाहण्यापेक्षा परदेशात जाऊन सामने पाहणे योग्य ठरेल,’’ असे मत चेन्नईच्या राजूने व्यक्त केले.
ऑनलाइन हाऊसफुल्ल तरी..!
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमची प्रेक्षकक्षमता १५,००० आहे. दिल्लीतील टप्प्याची तिकिटे संकेतस्थळावर उपलब्ध होताच फक्त २० मिनिटांत हाऊसफुल्लची पाटी झळकली, परंतु प्रत्यक्षात मात्र काही स्टँड रिकामे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. फेडरर, जोकोव्हिचला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता होती, मात्र हाऊसफुल्ल फलकाने अनेकांची निराशा केली. परंतु मैदानात प्रेक्षकांसाठी खुच्र्या उपलब्ध असल्याचे प्रत्ययास आले. इच्छा आणि पैसे देण्याची तयारी असूनही अनेकांना स्टेडियमऐवजी टीव्हीच्या माध्यमातूनच टेनिसताऱ्यांना पाहावे लागले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Dec 2014 रोजी प्रकाशित
खर्चीक तिकिटे, खराब खुच्र्या आणि ‘दूर’दर्शन!
रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, पीट सॅम्प्रस यांच्यासारखे दिग्गज खेळाडू भारतात खेळणार म्हटल्यावर देशभरातल्या टेनिसप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते.

First published on: 09-12-2014 at 02:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tennis lover upset over managment system in iptl