भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातील एका डावात १० बळी घेण्याचा पराक्रम डावखुरा फिरकी गोलंदाज एजाझ पटेलचे न्यूझीलंड कसोटी संघातील स्थान टिकवण्यासाठी पुरेसा ठरला नाही. मायदेशात होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी एजाझला वगळण्यात आले आहे.

एजाझने मुंबईतील कसोटी सामन्यात ११९ धावांत १० बळी घेतले होते. इंग्लंडचा जिम लेकर व भारताचा अनिल कुंबळे यांच्यानंतर तो कसोटी डावात १० बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला होता. परंतु १ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या १३ सदस्यीय न्यूझीलंड संघात एजाझला स्थान देण्यात आलेले नाही. देशात फिरकी गोलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्या तयार कराव्यात, अशी अपेक्षा एजाझने व्यक्त केली. या संघात ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी, कायले जेमिसन, नील वॅगनर, मॅट हेन्री आणि अष्टपैलू डॅरिल मिचेल यांच्यावर वेगवान माऱ्याची धुरा असेल. रचिन रवींद्र या एकमेव फिरकी गोलंदाजाला संघात स्थान दिले आहे.

’  संघ : टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, मॅट हेन्री, कायले जेमिसन, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, विल यंग.