रवांडा क्रिकेट स्टेडियम फाऊंडेशनच्या मदतीसाठी इंग्लंडमधील २२ वर्षीय अल्बी शालेने सलग २६ तास फलंदाजी करण्याचा अनोखा विक्रम नावावर केला आहे. लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर शालेने सोमवारी सकाळी ६.४५ वाजता फलंदाजीला सुरुवात केली आणि मंगळवारी सकाळी ८.४५ वाजता त्याने डाव घोषित केला. प्रदीर्घ वेळ फलंदाजी केल्यानंतर शाले अत्यानंदाने जमिनीवर कोसळला. त्याच्या विक्रमाचे महत्त्व जाणून त्याच्या सहकाऱ्यांनी शालेच्या दिशेने धाव घेतली आणि सर्वानी मिळून विजयी जल्लोष केला. याआधीचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या जेड चिल्डच्या नावावर होता. त्याने २५ तास फलंदाजी  केली होती. न्यूकॅस्टल विद्यापीठातून शालेने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. विक्रमाची अधिकृतरीत्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद व्हावी यासाठी शाले प्रयत्नशील आहे. २६ तास फलंदाजीचा विक्रम केल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर श्ॉम्पेनचा वर्षांव केला. शालेन जवळपास २०० गोलंदाजांचा सामना केला, ज्यामध्ये इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांचाही समावेश आहे. गिनीज जागतिक विक्रमानुसार, फलंदाजाला प्रत्येक तासाला पाच मिनिटांचा विश्रांती कालावधी घेण्याची तसेच नैसर्गिक विधीसाठी जाण्याची मुभा आहे.