रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद मिळवलं. मुंबईकडून सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह या खेळाडूंनी यंदाचा हंगाम गाजवला. सूर्यकुमार यादवचा फॉर्म पाहता त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात स्थान मिळेल अशी सर्वांना आशा होती. परंतू सुनिल जोशी यांच्या निवड समितीने सूर्यकुमारच्या नावाचा विचार केला नाही. आश्वासक कामगिरी केल्यानंतरही संघात स्थान न मिळाल्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. भारतीय संघाची निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी RCB विरुद्ध सामन्यात सूर्यकुमारने नाबाद अर्धशतकी खेळी करत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. RCB विरुद्ध सामन्यात सूर्यकुमार आणि विराट यांच्यात मैदानावर द्वंद्व रंगलं होतं…अनेकांनी यावरुन विराटवर टीकाही केली.

सूर्यकुमारने अखेरीस या विषयावर आपलं मौन सोडलं आहे. “त्या सामन्यात खेळायला खरंच मजा आली. मी सुरुवातीला थोडासा दडपणाखाली होतो. त्या सामन्यात आम्हाला विजयाची आवश्यकता होती…कारण गुणतालिकेत अव्वल राहून प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यासाठी आम्हाला विजय आवश्यक होता. त्या सामन्यात विराट आणि माझ्यात जे काही झालं ते त्या क्षणापुरतं मर्यादीत होतं.” Sports Tak च्या कार्यक्रमात बोलत असताना सूर्यकुमारने विराट कोहलीसोबत घडलेल्या त्या प्रसंगाबद्दल आपलं मत मांडलं.

४३ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला त्या सामन्यात सामनावीराचा किताब मिळाला. सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केली. अनेक माजी खेळाडूंनीही सूर्यकुमार यादवला आता भारतीय संघात स्थान मिळायला हवं असं वक्तव्य केलं होतं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही सूर्यकुमारला त्याची वेळ येईल असं म्हणत धीर धरण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर सूर्यकुमारला इंग्लंडच्या भारत दौऱ्यात स्थान मिळतंय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.