खेळ हा खेळभावनेनेच खेळला गेला पाहिजे, तरच त्या खेळाचा आनंद लुटता येऊ शकतो; पण जेव्हा खेळाच्या आनंदावर जिंकण्याची ईर्षां वरचढ होते, तेव्हा खेळाडू कोणत्याही थरावर जायला तयार असतात आणि विजयासाठी आपण काय करतो, याचे भानही त्यांना राहत नाही. इटलीविरुद्धच्या सामन्यात उरुग्वेच्या लुइस सुआरेझने घेतलेला ‘चावा’ हे त्याचे जिवंत उदाहरण. पण जर खेळाडू असे बेशिस्तपणे मैदानात एकमेकांशी हाणामाऱ्या करायला लागले तर करायचे काय, हा प्रश्न साऱ्यांनाच काही वर्षांपूर्वी पडला होता आणि प्रश्नाला चोख उत्तर मिळाले ते पिवळ्या आणि लाल कार्ड्सच्या रूपाने.
१९६२च्या विश्वचषकातील चिली आणि इटली यांच्यातील सामन्यामध्ये पहिल्यांदा बेताल वर्तणुकीवर पायबंद घातला गेला. केन अ‍ॅस्टॉन हे त्या वेळी मैदानावरील पंच होते आणि सामना सुरू झाल्यावर १२व्या सेकंदालाच त्यांनी खेळाडूला रोखण्यासाठी शिटी वाजवली. त्या वेळी अशा खेळाडूंवर कारवाईचे नियम नव्हते. त्यामुळे सगळे सोपस्कार करत गिओर्गीओ फेरिनीला १२व्या मिनिटाला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. फेरिनी मैदानाबाहेर जायला तयार नव्हता, त्या वेळी पोलिसांच्या मदतीने त्याला मैदानाबाहेर घालवण्यात आले. या सामन्याला ‘दी बॅटल ऑफ सँटिगो’ म्हणून ओळखले जाते.
त्यानंतरच्या १९६६च्या विश्वचषकातील अर्जेटिना आणि इंग्लंड यांच्यामधील सामन्यात पुन्हा एकदा असाच प्रकार घडला. त्या वेळी अ‍ॅस्टॉन हे पंचांच्या विभागाचे प्रमुख होते आणि अँटोनिओ रॅटिन या खेळाडूला बाहेर काढण्यासाठी त्यांनी खेळ थांबवला होता. या प्रकारांवर पायबंद घालण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, असे त्यांना या वेळी वाटले आणि त्यांनीच पुढाकार घेत कार्ड देण्याची पद्धत फुटबॉल विश्वात रूढ केली.
फुटबॉल जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये खेळला जातो, काही देशांच्या भाषाही निराळ्या असतात, त्यामुळे यासाठी वैश्विक उपाय शोधायला हवा, असे त्यांना वाटले आणि त्यांना आठवले ते रस्त्यांवरचे सिग्नल. त्यातून त्यांनी पिवळा आणि लाल रंग निवडला. कमी स्वरूपाची चूक असेल तर त्याला पिवळे कार्ड आणि गंभीर स्वरूपाची चूक असेल तर त्याला लाल कार्ड देण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठीचे नियमही त्यांनी पंचांना घालून दिले आणि खेळामध्ये शिस्त आली. मेक्सिकोमधील १९७०च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच कार्डचा वापर करण्यात आला. पहिले पिवळे कार्ड म्हणजे खेळाडूला ताकीद दिली जाते, पण जर त्याला सामन्यात दुसरे पिवळे कार्ड मिळाले तर त्याला सामना सोडावा लागतो, तर गंभीर स्वरूपाची चूक झाल्यावर लाल कार्ड दाखवले तर त्याच क्षणी खेळाडूला मैदान सोडावे लागते. या खेळाडूने मैदान सोडले की त्याबद्दल बदली खेळाडू खेळवता येत नाही.
आतापर्यंत विश्वचषकात बरीच पिवळी आणि लाल कार्ड्स देण्यात आली आहेत; यंदाच्या विश्वचषकामध्ये आतापर्यंत ११४ पिवळी आणि ८ लाल कार्ड्स देण्यात आली आहेत. स्पर्धेतील पहिले पिवळे कार्ड पहिल्याच सामन्यात ब्राझीलचा स्टार खेळाडू नेयमारला देण्यात आले आहे, तर पहिले लाल कार्ड उरुग्वेच्या मॅक्सी परेराला दिले गेले आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये जर्मनीला एकही कार्ड मिळालेले नाही, यावरून त्यांच्या खेळाचा अंदाज येऊ शकतो. सर्वात जास्त सात पिवळी कार्ड्स होंडुरास आणि आयव्हरी कोस्ट या संघांना मिळाली आहेत. फ्रान्स-होंडुरास या सामन्यात सात पिवळी आणि एक लाल कार्ड दिले गेले होते.
खेळाचा आनंद घ्यायचा असतो आणि द्यायचा असतो. जेव्हा खेळाडू स्वत: सामन्याचा आनंद घेऊ शकत नसेल तर तो इतरांना देऊ शकत नाही. जर खेळाडू खेळभावनेने खेळले तर या कार्डची काहीच गरज भासणार नाही आणि असाच सामना पाहण्याची, त्याचा आनंद अनुभवण्यासाठी चाहते आतुर असतील.
न्यूरेम्बर्गची लढाई
न्यूरेम्बर्गची लढाई म्हणजेच ‘बॅटल ऑफ न्यूरेम्बर्ग’ या नावाने हा सामना फुटबॉल इतिहासात ओळखला जातो. या सामन्यात खेळ कमी आणि हाणामाऱ्याच जास्त गाजल्या. पोर्तुगाल आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये २००६च्या विश्चषकातील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात खेळाडू गोल करण्यासाठी काहीही करायला आणि कोणत्याही थरावर जायला तयार होते. या सामन्यात रशियाचे पंच व्हॅलेंटिन इव्हानोव्ह यांनी तब्बल ४ लाल कार्ड आणि १६ पिवळी कार्ड दाखवली होती, म्हणजे जवळपास दोन्हीही संघांतील प्रत्येक खेळाडूला कार्ड मिळाले होते. सामन्याच्या आठव्याच मिनिटाला नेदरलँड्सचा बचावपटू खालिद बोऊलाहरोऊझने ख्रिस्तियानो रोनाल्डोला पाडले आणि त्याला जबर दुखापत झाली. डबडबलेल्या डोळ्यांनी रोनाल्डोला मैदान सोडावे लागले, पण त्यानंतर २३व्या मिनिटाला पोर्तुगालने गोल केला आणि हाच गोल अखेरीस निर्णायक ठरला. नेदरलँड्सच्या खालिदने ६३व्या मिनिटाला फिगोलाही पाडले आणि यामुळेच त्यालाही मैदान सोडावे लागले. या सामन्यात सुदैवी ठरला तो रॉबिन व्हॅन पर्सी, कारण पोर्तुगालच्या पेनल्टी भागामध्ये त्याने रिकाडरेशी बाचाबाची केली होती, पण त्याला पिवळे कार्ड मिळाले नाही. या सामन्यानंतर त्या वेळचे फिफाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांनी पंच इव्हानोव्ह यांच्यावर कडाडून टीका केली. ‘‘इव्हानोव्ह यांनी चुकीच्या कामगिरीमुळे स्वत:लाच पिवळे कार्ड द्यायला हवे,’’ असे ब्लॅटर यांनी म्हटले होते.