बंगळुरू कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लियॉनने पहिल्या डावात तब्बल ८ विकेट्स घेऊन भारताचा डाव १८९ धावांमध्ये संपुष्टात आणला होता. दुसरीकडे भारताकडून मात्र रविचंद्रन अश्विनला यश मिळाले नाही. अश्विनला पहिल्या डावात केवळ दोन विकेट्स मिळाल्या. २८ वर्षीय नॅथन लियॉनने भारत दौऱयावर येण्याआधी दुबईमध्ये सराव शिबीरात चांगलाच कसून सराव केल्याचे बंगळुरू कसोटीतील पहिल्या डावातील कामगिरीवरून लक्षात येते. लियॉनच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत लियॉन पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये नसतानाही त्याने आठ विकेट्स मिळवल्या असताना अव्वल मानांकित अश्विन देखील ऑस्ट्रेलियाचा डाव नेस्तनाभूत करेल, अशी आशा होती. मात्र, तसे काहीच घडले नाही. अश्विनला अपयश आले. नॅथन लियॉनला गोलंदाजीत चांगली उसळी मिळत होती, पण अश्विनना चेंडूला उसळी देणे शक्य होत नव्हते. दोघांच्या गोलंदाजी करण्याच्या पद्धतीची पडताळणी केली असता देहबोलीतील आणि चेंडू सोडण्याच्या पद्धतीत फरक असल्याचे दिसून येते.
मात्र, दोघांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी पाहता अश्विन कितीतरी पटीने लियॉनच्या पुढे असल्याचे दिसते. अश्विनने अवघ्या ८४ इनिंगमध्ये २४ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. तर लियॉन आकडेवारीच्याबाबतीत तितका प्रभावशाली राहिलेला नाही.