खेळासाठी घरातून पळून नंतर थेट डेन्मार्क गाठणाऱ्या जिद्दीची कहाणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॅडमिंटनचा वारसा घरामध्ये होताच, पण परिस्थिती बेताची होती. खेळापेक्षा पोटाची खळगी भरणे महत्त्वाचे होते. १६व्या वर्षांपर्यंत तो बॅडमिंटन खेळत होता. त्यानंतर त्याला कोलकात्यामध्ये एक सरकारी नोकरी मिळाली. घरच्यांनी त्याला नोकरी पत्करायला सांगितली, पण त्याला खेळायचेच होते. आई आणि भावाचा निर्णय त्याने झुगारला. घरातून तो पळाला. कोलकात्याहून थेट ठाण्यामध्ये दाखल झाला तो त्याच्या बहिणीकडे. भावाला हे समजले आणि ‘तू परत घरी येऊ नकोस,’ असे त्याने खडसावले. ठाण्यात श्रीकांत वाड यांच्याकडे त्याने प्रशिक्षण घेतले, कसलेही शुल्क न भरता. वाड यांनी त्याला मुलासारखे जपले. आहारापासून ते प्रशिक्षणापर्यंत सर्व दिले. त्यानंतर तो बेंगळूरुला गेला आणि तिथून त्याने भरारी घेतली ती थेट डेन्मार्कमध्ये. तिथे तो आता बॅडमिंटन लीग खेळतो. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला अ‍ॅक्सलसन व्हिक्टर हा त्याचा चांगला मित्र आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या शुभंकर डे याच्या जिद्दीची ही कहाणी आहे.

शुभंकर हा सध्याच्या घडीला जागतिक क्रमवारीत पुरुष एकेरी विभागात ६३व्या स्थानी आहे. आतापर्यंत १६१ सामन्यांमध्ये त्याने १०२ सामने जिंकले असून ५९ लढतींमध्ये त्याला पराभव पत्करावा लागला आहे. लीगमध्ये तो बेंगळूरु ब्लास्टर्स संघाकडून खेळत आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवत त्याने चेन्नई स्मॅशर्सला धक्का दिला.

बॅडमिंटन प्रीमिअर लीगमध्येही शुभंकरला सहजासहजी प्रवेश मिळाला नाही. शुभंकरने पराभूत केलेल्या हर्षिल दाणीला बेंगळूरुच्या संघाने आपल्या ताफ्यात घेतले होते, पण दाणी जायबंदी झाला आणि संधी मिळाली ती शुभंकरला. ‘‘मला या गोष्टीची कल्पना होती. त्यामुळे लीगमध्ये मला संधी मिळाली नसती तरी मी निराश झालो नाही. दुसऱ्या स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली; पण हर्षिल दुखापतग्रस्त झाला आणि मला संधी मिळाली. या लीगमधील अनुभवाचा मला यापुढे चांगला फायदा होईल,’’ असे तो सांगत होता.

नवीन नियमांचा खेळावर परिणाम!

आंतरराष्ट्रीय स्तरावर नियम हे सातत्याने बदलताना पाहायला मिळतात. आता जे काही नियम बदलले आहेत ते खेळाडूंसाठी जाचक ठरू शकतात. या नवीन नियमामुळे खेळाडूंना त्रास होणार असेल तर त्याचा परिणाम नक्कीच खेळावरही होईल, असे शुभंकरने सांगितले.

माझा मीच प्रशिक्षक!

आतापर्यंत काही प्रशिक्षकांचे मला मार्गदर्शन मिळाले आहे, पण सध्याच्या घडीला मीच माझा प्रशिक्षक आहे, कारण डेन्मार्कमध्ये स्वत:हून खेळ शिकण्यावर भर दिला जातो. त्यामुळे डेन्मार्कमध्ये मी स्वत: सराव करत असतो. काही समस्या जाणवली तर काही तज्ज्ञांचा सल्ला घेतो; पण मुख्यत्वेकरून मीच स्वत:ला घडवण्याचा प्रयत्न करत आहे, असे शुभंकर म्हणाला.

..तरी भारताकडूनच खेळतो!

बहुतांशी स्पर्धा या युरोपला होतात. त्यामुळे भारतातून तिथे जाण्या-येण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे मी डेन्मार्कला राहण्याचा निर्णय घेतला; पण याचा अर्थ मी तिथला नागरिक झालो, असे नाही. आत्तादेखील मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडूनच खेळतो, असे शुभंकर म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The success story of subhankar dey
First published on: 12-01-2018 at 02:20 IST