आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना आपल्या पायदळी तुडवून जगभरातील कोट्यवधी क्रिकेट प्रेमींच्या मनात घर करणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस खास आहे. बरोबर २९ वर्षांपूर्वी याच दिवशी सचिनने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आज या आठवणींना सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन उजाळा दिला आहे. वयाच्या १६ व्या वर्षी सचिनने १९८९ साली पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं.

आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या सचिनने पहिल्या डावात फक्त १५ धावा काढल्या होत्या. या सामन्यात पाकिस्तानच्या वकार युनूसने सचिनला बाद केलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे वकार युनूसचाही तो पदार्पणाचाच सामना ठरला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४ पेक्षा जास्त वर्षांच्या कारकिर्दीनंतर सचिनने अखेर निवृत्ती घेतली. योगायोगाची गोष्ट म्हणजे २०१३ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर याच दिवशी सचिनने विंडीजविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. या कसोटीत सचिनने ७४ धावा केल्या होत्या.