वेगवान गोलंदाज टिनो बेस्टने ४० धावांत घेतलेल्या ६ बळींच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशवर १० विकेट्सनी मात केली. या विजयासह वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. ६ बाद २२६ वरून पुढे खेळणाऱ्या बांगलादेशचा डाव २८७ धावांवर आटोपला. नासिर हुसैनने ११ चौकार आणि १ षटकारासह ९४ धावा केल्या. टिनो बेस्टने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडले. विजयासाठी मिळालेले २७ धावांचे लक्ष्य सहज पूर्ण करीत वेस्ट इंडिजने मालिकेत निर्विवाद विजय मिळवला. द्विशतकी खेळी करणाऱ्या मार्लन सॅम्युअल्सला सामनावीर तर शिवनारायण चंद्रपॉलला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.