भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आज भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवून नवा इतिहास घडवला आहे. नीरज चोप्राने भारताला आज सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. याचबरोबर, लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम देखील मोडीत काढला. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ६ पदकं जिंकली होती. त्यानंतर आता २०२१ मध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिंकत, लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताला पदक मिळवून देणाऱ्यांमध्ये रौप्य (मीराबाई चानू), कांस्य (पीव्ही सिंधू), कांस्य (लव्हलिना बोर्गोहेन), कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ), रौप्य (रविकुमार दहिया), कांस्य (पुनिया) आणि सुवर्ण (नीरज चोप्रा) यांचा समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतलेला आहे.

शेवटी सुवर्ण पदक जिंकलंच! टोक्योमध्ये नीरज चोप्रानं घडवला इतिहास!

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. चेक रिपब्लिकच्या वडलेजनं ८६.६७ मीटर, तर वेसेली ८५.४४ मीटर लांब भाला फेकला. नीरज चोप्राला सुवर्ण पदक मिळालं. तर वडलेज आणि वेसेलीला अनुक्रमे रजत आणि कांस्य पदक मिळालं.

जाणून घ्या भारताचा ऑलिम्पिकमधील आतापर्यंतचा प्रवास

भारत १९०० पासून ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेत आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सर्वप्रथम १८९६ मध्ये ग्रीसच्या अ‍ॅथेंसमध्ये पार पडली होती. त्यानंतर भारताने १९०० साली पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ९ सुवर्ण, ८ रजत आणि १५ कांस्य पदकं पटकावली आहेत.