टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याच्या निर्धाराने उतरलेल्या बजरंग पुनियाने जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं. किर्गीस्तानच्या कुस्तीपटूचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळलेल्या बजरंगचा इराणचा कुस्तीपटू आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या मोर्तेजा घियासी यांच्यासोबत लढत झाली. सामन्याच्या सुरुवातीलाच घियासीने आघाडी घेतल्यानं भारतीयांचा श्वास रोखला गेला. मात्र, शेवटच्या काही क्षणात बजरंगने चपखलपणे घियासीला चितपट केलं आणि सामना आपल्या नावे केला. या विजयाबरोबरच बजरंग पुनियाने उपांत्य फेरीत धडक मारली.

भारताचा कुस्तीपटू रविकुमार दहियाने रौप्य पदकावर नाव कोरल्यानंतर भारतीयांच्या नजरा भारताची महिला कुस्तीपटू सीमा बिस्ला आणि ६५ किलो वजनी गटातील कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यावर लागल्या होत्या. सुरूवातीच्याच सामन्यात सीमा बिस्लाचा पराभव झाला. मात्र, बजरंग पुनियाने सलग दोन सामन्यात जबरदस्त कामगिरीच प्रदर्शन करत भारतीयांच्या पदकाच्या आशा पल्लवित केल्या.

किर्गीस्तानचा कुस्तीपटू अकमातालिवचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेल्या बजरंग पुनियाने या फेरीतील सामन्यातही धडाकेबाज विजयाची नोंद केली. उपांत्यपूर्व फेरीत बजरंग पुनियाची इराणचा कुस्तीपटू मोर्तेजा घियासी यांच्या लढत झाली. आशियाई स्पर्धेत कांस्यपदक विजेता असलेल्या मोर्तेजा आणि बजरंगमध्ये कडवी झुंज बघायला मिळाली.

सामन्याच्या प्रारंभी मोर्तेजाने आघाडी घेतली. पहिल्या सत्रानंतर बजरंग पुनिया ०-१ असा पिछाडीवर होता. मात्र, दुसऱ्या सत्रात बजरंग पुनियाने सामन्यात वापसी केली शेवटचे काही सेंकद उरलेले असताना बजरंग पुनियाने मोर्तेजाला लोळवत सामना २-१ अशा फरकाने जिंकला.

पुरुष फ्रीस्टाइल ६५ किलो वजनी गटात कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या कामगिरीकडे देशाचं लक्ष असून, २०१६च्या रिओ ऑलिम्पिकला मुकल्यानंतर बजरंगने सगळ्याच आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धात आपला ठसा उमटवला असून, २०१८ आणि २०१९च्या विश्वचषक स्पर्धामध्येही त्याने एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे.