सिद्धार्थ त्रिवेदीची कबुली
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणावरून राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू सिद्धार्थ त्रिवेदीची दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान, त्रिवेदीने सट्टेबाजांकडून पैसे घेतल्याचे कबुल केले असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. गुन्हे प्रक्रियेच्या कलम १६४ नुसार त्रिवेदीचा जबाब नोंदविण्यात आला.
त्रिवेदी दिलेल्या जबाबानुसार त्याने दोनवेळा, एकदा १ लाख आणि नंतर २ लाख असे एकूण ३ लाख रुपये सट्टेबाज दिपक शर्मा व सुनिल भाटिया यांच्याकडून घेतले होते. पण, त्यानंतर गेल्या वर्षी सात खेळाडूंचे सट्टेबाजी प्रकरण त्रिवेदीला आठवले व त्याने घेतलेले पैसे घाबरून परत केले. यावर गेल्यावर्षी झालेले स्टिंग ऑपरेशन माझ्यासाठी डोळे उघडणारे ठरले होते असेही त्रिवेदीने जबाबात म्हटले.
२०१० साली अमित सिंग व आणखी एका राजस्थान रॉयल्सचा खेळाडू यांनी अहमदाबादमधील सट्टेबाजांशी त्रिवेदीची ओळख करुन दिली असल्याची माहितीही समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी याआधीच फिक्सिंग प्रकऱणी अमित सिंग याला अटक केली आहे.
त्यानंतर स्पॉट फिक्सिंग प्रकऱणी अटक करण्यात आलेला खेळाडू अजित चंडीला याच्याशी २०११ साली त्रिवेदीची ओळख झाली व त्याच्या संपर्कातून सट्टेबाज दिपक शर्मा याच्या संपर्कात त्रिवेदी आला. तसेच फेब्रुवारी २०१२ मध्ये अजितने सिद्धार्थ त्रिवेदीला अहमदाबादमधील क्रिकेट मालिकेत खेळण्यासाठी बोलविले त्यादरम्यान, सट्टेबाज सुनिल भाटिया याच्याशी त्याची ओळख झाली. अशी सर्व माहिती सिद्धार्थ त्रिवेदीने चौकशीदरम्यान दिली आहे.