टूर डि फ्रान्स सायकल शर्यतीत टीम स्कायच्या ख्रिस फ्रूमने १५व्या फेरीअखेर महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मात्र शर्यतीच्या प्रत्येक टप्प्यात फ्रूमच्या वर्चस्वाने उत्तेजक सेवनांच्या चर्चेला उधाण आले. टूर डि फ्रान्स शर्यतीच्या अवघड टप्प्यावर मी निर्णायक आघाडी घेतली. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी ही घटना आहे. माझ्या मेहनतीला दाद देण्याऐवजी माझ्यावर उत्तेजक सेवनाचे आरोप होत आहेत. या आरोपांनी व्यथित झालो आहे, अशा शब्दांत फ्रूमने आपल्या भावना व्यक्त केल्या.
उत्तेजक सेवनांच्या आरोपांसंदर्भात वाडाला (जागतिक उत्तेजक विरोधी संघटना) संघाविषयी सर्व माहिती देण्यास तयार असल्याचे टीम स्काय संघाचे प्रमुख सर डेव्ह ब्रेल्सफोर्ड यांनी सांगितले.  
केनियात जन्मलेल्या आणि इंग्लंडमध्ये सायकलिंगची धुळाक्षरे गिरवलेल्या फ्रूमने १५व्या फेरीअखेर ४ मिनिटे आणि १४ सेकंद एवढय़ा मोठय़ा फरकाने आघाडी नोंदवली. मोंट वेंटोक्स येथे समाप्त झालेल्या पंधराव्या फेरीत त्याने वर्चस्व गाजवले, मात्र त्याच्या अद्भुत कौशल्याऐवजी त्याने उत्तेजकांच्या आधारे हे यश मिळवल्याच्या अफवांना उधाण आले आहे. फ्रूम आणि टीम स्कायचे प्रमुख ब्रेल्सफोर्ड यांनी आम्ही नियमांच्या चौकटीत राहून शर्यतीत सहभागी होत असल्याचा दावा केला आहे.
 मी आणि माझे सहकारी घरापासून दूर अनेक महिने केवळ या शर्यतीसाठी सराव करत आहोत. शर्यतीत वर्चस्व राखण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शिकस्त करत आहोत आणि त्याच वेळी माझ्यावर उत्तेजक सेवनाचे आरोप होत आहेत, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही, असे फ्रूमने सांगितले. रविवारी धावपटू टायसन गे आणि असाफा पॉवेल उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याचे स्पष्ट झाले होते. सायकलिंगचा हीरो अशी प्रतिमा असलेल्या लान्स आर्मस्ट्राँगच्या कृष्णकृत्यांचा बुरखा अमेरिकेच्या उत्तेजकविरोधी संघटनेने फाडला होता. त्या पाश्र्वभूमीवर फ्रूमच्या यशालाही उत्तेजकांची किनार असावी अशा चर्चाना ऊत आला आहे. लान्सने गैरपद्धतींचा वापर केला, मी तसे करत नाही, असे फ्रूमने स्पष्ट केले.
वाडाचे अधिकारी संघासंदर्भातली सर्व माहिती तपासू शकतात. आम्ही कशा पद्धतीने सराव करतो हेही ते पाहू शकतात. आमच्या कामगिरीचा तौलनिक अभ्यास ते करू शकतात. यानुसार आम्ही नियमांनुसार वाटचाल करत आहोत की नाही हे ते ठरवू शकतात, असे त्याने पुढे सांगितले.
सायकलिंग क्षेत्राला लागलेला उत्तेजकांचा अभिशाप लक्षात घेता माझ्यावर आरोप होणे साहजिक आहे. चाहत्यांचा असंख्य वेळा विश्वासघात झाला आहे, पण या चाहत्यांमध्ये माझाही समावेश आहे. मीही काही सायकलपटूंचा चाहता होतो आणि त्यांच्या उत्तेजकांच्या कबुलीने माझी निराशा झाली आहे. म्हणूनच मी असे काही करणार नाही, असे फ्रूमने सांगितले.