बँकॉक : दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरील अ‍ॅन सेयंगचा अडथळा ओलांडण्यात पुन्हा अपयशी ठरली. परिणामी बुधवारी उबर चषक महिला बॅडिमटन स्पर्धेच्या ड-गटातील अखेरच्या साखळी लढतीत भारताने कोरियाकडून ०-५ अशी हार पत्करली.

भारताला उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल करण्यापूर्वी हा धोक्याचा इशारा मिळाला आहे. सिंधूने सेयंगविरुद्धच्या सामन्यात १५-२१, १४-२१ असा पराभव पत्करला.

ली सोहली आणि शिन सेयंगचॅन जोडीने ३९ मिनिटांत श्रृती मिश्रा आणि सिमरन सिंघी जोडीला २१-१३, २१-१२ असे हरवले.

आकर्षी कश्यप किम गा ईयुनविरुद्ध १०-२१, १०-२१ अशी अपयशी ठरली. मग किम ही जीआँग आणि काँग हीयाँग जोडीने तनिशा क्रॅस्टो आणि त्रिसा जॉली जोडीला २१-१४, २१-११ असे हरवले. अखेरच्या एकेरी लढतीत अश्मिता छलिहाने सिम युजिनकडून १८-२१, १७-२१ असा पराभव पत्करला.

चायनीज तैपेईकडून पुरुष संघाची हार

बँकॉक : भारतीय पुरुष संघाने थॉमस चषक बॅडिमटन स्पर्धेच्या क-गटाच्या अखेरच्या साखळी लढतीत चायनीज तैपेईकडून २-३ अशी हार पत्करली. या लढतीत लक्ष्य सेनचा एकेरीत, तर सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीचा दुहेरीच्या संघर्षपूर्ण लढतीत पराभव झाला. परंतु किदम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांनी विजय नोंदवले.

जागतिक कांस्यपदक विजेत्या लक्ष्यने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरील चोऊ टीन चेनविरुद्ध १९-२१, २१-१३, १७-२१ असा पराभव पत्करला. सात्त्विक-चिराग जोडीला ली यँग आणि वांग चि-लिन जोडीचा अडथळा ओलांडण्यात ११-२१, १९-२१ असे अपयश आले. तिसऱ्या लढतीत जागतिक रौप्यपदक विजेत्या श्रीकांतने झू वेई वांगवर २१-१९, २१-१६ असा विजय मिळवला. मग अर्जुन-ध्रुवने लू चिंग याओ आणि यांग पो हॅन जोडीविरुद्धचा सामना १७-२१, २१-१९, १९-२१ असा गमावला. अखेरच्या लढतीत प्रणॉयने लु चिआ हंगविरुद्ध २१-१८, १७-२१, २१-१८ असा विजय मिळवला.