ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असतानाच मुंबईतील अवकाळी पावसाचा वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

बुधवारी मुंबईत जवळपास संपूर्ण दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली. त्यामुळे दोन्ही संघांचे सराव सत्र रद्द करण्यात आले. वानखेडेची खेळपट्टीसुद्धा पूर्णपणे झाकून ठेवण्यात आली असून काही ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाल्याचेही निदर्शनास आले. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी दुपापर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस पडेल. शुक्रवारपासून उभय संघांतील दुसऱ्या कसोटीला प्रारंभ होणार असून त्या दिवशीही पावसामुळे काही षटकांचा खेळ वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत. शनिवारपासून आकाश निरभ्र असेल, अशी आशा आहे.

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने या कसोटीसाठी स्टेडियमच्या एकूण प्रेक्षकक्षमतेपैकी फक्त २५ टक्के चाहत्यांनाच प्रवेशाची मुभा दिली आहे. त्यामुळे फक्त १,५०० तिकिटे सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना मिळणार असताना पाच वर्षांनी वानखेडेवर होणाऱ्या कसोटीत पावसाने खेळखंडोबा केल्यास सर्वाचाच हिरमोड होईल.